जिल्हा

दोन लाख गौरी-गणपती घेणार ठाण्याचा पाहुणचार

दोन लाख गौरी-गणपती घेणार ठाण्याचा पाहुणचार
दोन लाख गौरी-गणपती घेणार ठाण्याचा पाहुणचार फोटो: ठाणे वैभव

गणेशभक्तांची लगबग, पोलिसांची धावपळ

ठाणे: गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषाने ठाणे भक्तिमय होणार असून यंदा ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत तब्बल एक लाख ८२,६१४ गणेशमूर्ती आणि १६ हजार गौरींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये एक लाख ६५,४४८ घरगुती गणपती, १०७६ सार्वजनिक गणपती आणि १६०९० गौरींचा समावेश आहे.

सोमवार १४ सप्टेंबरपासून गणरायाचे आगमन होणार असून, दुसऱ्या दिवशी दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकींना सुरुवात होईल. दीड, तीन, पाच, सात, आठ आणि नऊ दिवसांच्या गणपतींसह अनंत चतुर्दशीपर्यंत विसर्जनाचे टप्पे सुरू राहणार आहेत. यामुळे शहरातील रस्ते, तलाव आणि विसर्जन घाटांवर गणेश भक्तांची गर्दी ओसंडून वाहणार आहे.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण परिमंडळात सर्वाधिक ६०,०६६ गणेशमूर्ती व गौरींची स्थापना होणार आहे. उल्हासनगर परिमंडळात ५४,२०९, वागळे इस्टेटमध्ये ३४,२२७, ठाणे परिमंडळात १७,२४८ आणि भिवंडी परिमंडळात १६,८६४ मूर्तींची नोंद आहे.

कल्याणमध्ये सार्वजनिक गणपतींची संख्या ३०२ असून घरगुती गणपती ५२,५४४ आहेत. ठाणे परिमंडळात १२८ सार्वजनिक आणि १५,३५२ घरगुती गणपती, तर वागळे इस्टेटमध्ये २०२ सार्वजनिक आणि ३२,३२६ घरगुती गणपतींची नोंद झाली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मंडळांच्या तुलनेत घरगुती गणपतींची संख्या तब्बल एक लाख ६५,४४८ आहे. त्यासोबत १६,०९० गौरींची स्थापना होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात घराघरांत बाप्पांच्या आरतीचा आणि गौरींच्या पूजनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

विसर्जनाच्या सर्व दिवसांमध्ये २५ सप्टेंबरचा दिवस सर्वाधिक धामधुमीचा ठरणार आहे. अनंत चतुर्दशीला तब्बल ७९६ सार्वजनिक आणि ४०,२६७ घरगुती गणपतींचे विसर्जन अपेक्षित आहे. त्याआधी १५ सप्टेंबरला दीड दिवसाच्या ४४,१४६ गणपतींचे, तर १९ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरीसह ४०,९४१ घरगुती गणपती आणि १६,०९० गौरींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवसांनाही विसर्जन घाटांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे

विसर्जनाची गर्दी विभागण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात तब्बल १९३ विसर्जनस्थळे निश्चित केली आहेत. यामध्ये कल्याण परिमंडळात सर्वाधिक ५६, उल्हासनगरमध्ये ४३, भिवंडीत ३९, ठाण्यात ३८ आणि वागळे इस्टेट परिमंडळात १७ विसर्जनस्थळे आहेत. गणेशमूर्ती संकलनासाठी ६६ कलेक्शन सेंटर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कल्याणमध्ये २६, वागळे इस्टेटमध्ये १३, उल्हासनगरमध्ये १२, भिवंडीत १० आणि ठाण्यात पाच केंद्रांचा समावेश आहे.

ठाण्यातील मासुंदा तलाव, खारेगाव-पारसिक रेतीबंदर, भिवंडीतील नदी नाका व वऱ्हाळदेवी घाट, कल्याणमधील दुर्गाडी गणेश घाट, मोठागाव रेतीबंदर आणि काल्हेर खाडी, उल्हासनगरमधील उल्हासनदी व मोहना घाट, तसेच वागळे इस्टेटमधील उपवन तलाव आणि कोलशेत खाडी या प्रमुख ठिकाणी विसर्जनाची मोठी लगबग राहणार आहे.

गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार असून, गणपती संकलन केंद्रे आणि प्रमुख विसर्जन घाटांवर गर्दीचे नियोजन करावे लागणार आहे. विशेषतः १५ सप्टेंबर, १९ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्जन होणार असल्याने वाहतूक, सुरक्षा आणि विसर्जन व्यवस्थेची कसोटी लागणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475