ठामपाचे काम, सहा महिने थांब!
ठाणे : गेले सहा महिने ठाणे महापालिकेचे उंबरठे झिजवूनही एमएसईबीला सब स्टेशनसाठी भूखंड मिळत नसल्याने ढोकाळी, कोलशेत, बाळकुम आदी परिसर अखंडित वीज पुरवठ्यापासून वंचित राहत असल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली आहे. प्रशासनाने तातडीने भूखंड उपलब्ध करून देण्याची सूचना आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
ठाणे शहरात १५० मीटरहून अधिक उंचीच्या ७९पेक्षा जास्त इमारतींचे बांधकाम एकाचवेळी सुरू असून हा जागतिक विक्रम असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे इमारती उभ्या राहत असताना वाढत्या लोकसंख्येसाठी प्रशासनाने सोयी-सुविधा पुरवण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र घोडबंदर भागात एमएसईबीला सब स्टेशनसाठी भूखंड मिळत नसल्याने ढोकाळी, कोलशेत, बाळकुम आदी परिसर पुरेशा आणि अखंडित वीज पुरवठ्यापासून वंचित राहिला आहे. याबाबत एमएसईबी प्रशासनाने ठाणे महापालिकेकडे सात हजार चौरस मीटर भूखंडाची मागणी केली आहे, मात्र गेले सहा महिने हा भूखंड देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. शहर विकास विभागाने ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन, चार्जिंग स्टेशन आदी सूविधांसाठी भूखंड आरक्षित करणे गरजेचे असून संबंधित सब स्टेशनसाठी महापालिकेने तातडीने भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित १२८व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात नौपाडा येथील जुन्या इमारतीमधील रहिवासी उपस्थित होते. जुन्या इमारती धोकादायक ठरवून त्या सी १ वर्गात समाविष्ट करून त्या पाडणारी टोळी शहरात सक्रिय असून अधिकारी आणि विकासकांच्या संगनमतामुळे रहिवासी देशोधडीला लागत असल्याचे श्री.केळकर यांनी माध्यमांना सांगितले. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे, इमारत मजबूत असेल तर पाडण्यात येऊ नये. विकासकांच्या बाजूने भूमिका बजावू नका, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही श्री.केळकर यांनी सांगितले.
चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी विविध मार्गांवर नवीन एसटी सेवा सुरू करण्याबाबत विभागीय नियंत्रकांशी चर्चा होत असून ठाणे ते पैठण ही बस सुरू करण्याबाबतही सूचना केल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. यावेळी वारसा हक्काने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवून दिल्याने एका कर्मचाऱ्याने कुटुंबासह उपस्थित राहून आमदार केळकर यांचे आभार मानले. अशा प्रकरणांसाठी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना हेलपाटे मारण्याची गरज लागू नये, यासाठी आदर्श नियमावली महापालिकेने करावी, अशी मागणीही श्री.केळकर यांनी केली.