ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने सहाचाकी व त्यावरील मध्यम, जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे.
ही बंदी आजपासून १५ दिवस प्रायोगिक तत्त्वावर लागू राहणार असून, नागरिक व वाहनचालकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून पुढे कायमस्वरूपी बंदीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सहाचाकी व त्यावरील मध्यम, जड आणि अवजड वाहनांना निश्चित ठिकाणी प्रवेशबंदी राहणार आहे.
बेलापूर, नवी मुंबईकडून कळव्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना विटावा जकात नाका येथे प्रवेशबंदी राहील. या वाहनांना पटणी-ऐरोलीमार्गे डावीकडे वळून मुलुंडमार्गे ठाणे-नाशिक महामार्गावरून घोडबंदर किंवा नाशिकच्या दिशेने जाता येईल.
माजिवडा-साकेत-महालक्ष्मी मंदिर-राबोडीमार्गे कळवा नाक्याकडून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सहाचाकी व त्यावरील मध्यम, जड आणि अवजड वाहनांना महालक्ष्मी मंदिर येथे प्रवेशबंदी असेल. या वाहनांना खारीगाव टोलनाक्यावरून डावीकडे वळून गॅमन जंक्शन, पारसिक-मुंब्रा, कल्याण फाटा, शिळ-डायघरमार्गे इच्छितस्थळी जाता येईल. पारसिक सर्कलमार्गे कळव्याच्या दिशेने नवी मुंबई किंवा ठाणे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना पारसिक सर्कल येथे प्रवेशबंदी राहील. या वाहनांना पारसिक-मुंब्रा-कल्याण फाटा-शिळ-डायघर किंवा खारेगाव टोलनाका मार्गाचा वापर करता येईल.
पारसिक सर्कलकडून कळवा नाकामार्गे नाशिक अथवा पुढील दिशेने जाणाऱ्या मध्यम, जड व अवजड वाहनांना कळवा नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांना पटणी-ऐरोलीमार्गे डावीकडे वळून मुलुंडमार्गे ठाणे-नाशिक महामार्गावरून घोडबंदर किंवा नाशिकच्या दिशेने जाता येईल.