५० दिवस मृत्यूशी झुंज
ठाणे: प्रसूतीनंतर उद्भवलेल्या गंभीर संसर्गासह अनेक आजारांचा सामना करणाऱ्या ३५ वर्षीय मातेला ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल ५० दिवसांच्या उपचारांनंतर नुकतेच सुखरूप घरी पाठवले.
अनियंत्रित मधुमेह, डेंग्यू, औषधांना दाद न देणारा एमआरएसएचा संसर्ग, थायरॉईडचा त्रास आणि फुफ्फुसात पाणी साचल्याने महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर मातेला डॉक्टरांनी जीवदान दिले.
नाझिया असे रुग्णाचे नाव आहे. त्यांना ४ जुलै २०२६ रोजी तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर पाचव्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, नवव्या दिवशी त्यांना तीव्र ताप आला. शस्त्रक्रियेची जखम उघडली असून त्यामध्ये गंभीर संसर्ग झाल्याचे आढळले. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अनियंत्रित मधुमेह, डेंग्यू, औषधांना दाद न देणारा एमआरएसएचा संसर्ग, थायरॉईडचा त्रास आणि फुफ्फुसात पाणी साचल्याने महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना एकाच वेळी अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याने उपचार डॉक्टरांसाठीही आव्हानात्मक होते. त्यांच्यावर प्रभावी प्रतिजैविके, इन्सुलिनद्वारे मधुमेहावर नियंत्रण आणि सतत वैद्यकीय देखरेख सुरू करण्यात आली.
जखम लवकर भरून यावी यासाठी ‘व्हॅक्यूम ड्रेसिंग’ या आधुनिक उपचारपद्धतीचा वापर करण्यात आला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करून जखमेवर टाके घालण्यात आले. दरम्यान, दीर्घकाळ उपचार सुरू असल्याने नाझिया मानसिकदृष्ट्याही खचल्या होत्या. त्यांनी काही वेळा उपचार थांबवून घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, डॉक्टरांच्या पथकाने त्यांचे सातत्याने समुपदेशन केले आणि उपचार सुरू ठेवण्यासाठी त्यांना धीर दिला.
प्रमुख डॉ. जे. बी. सेनापती आणि युनिट प्रमुख डॉ. सुनिता उबाळे यांनी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले. डॉ. प्रिती नायकोडे, डॉ. प्राजक्ता मोरे, डॉ. एकता प्रसाद यांच्यासह वैद्यकीय पथकाने उपचार आणि समुपदेशन केले. अखेर ५० दिवसांच्या उपचारांनंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. त्यांच्या जखमाही पूर्णपणे भरल्या. रुग्णालयातून घरी जाण्यापूर्वी त्यांनी अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांची भेट घेऊन डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी या वृत्तांस दुजोरा देत नाझिया यांनी रुग्णालयाला आभाराचे पत्रही दिल्याचे सांगितले. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी हे येणाऱ्या रुग्णांशी अतिशय सौजन्याने वागतात. तसेच रुग्णांनादेखील त्यांच्या सौहार्दपूर्ण वागणुकीचा नेहमीच अनुभव येतो. त्यामुळे मला त्यांचा रास्त अभिमान आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या सामाजिक बांधिलकीचे हा प्रसंग म्हणजे एक द्योतकच आहे, असेही त्यांनी सांगितले.