जिल्हा
नोकरदार महिलांच्या वसतीगृहासाठी राज्य शासन देणार ५० कोटी
नोकरदार महिलांच्या वसतीगृहासाठी राज्य शासन देणार ५० कोटी
फोटो: ठाणे वैभव
ठाणे महापालिकेकडून बांधकामास मान्यता
ठाणे : नोकरदार महिलांसह व्यवसाय-उद्योग करणाऱ्या महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन भाईंदरपाडा भागात महिलांसाठी वसतीगृह बांधण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
ठाण्यातह आयटी पार्क उभे राहत असून शहरात औद्योगिक कारखानेही आहेत. दुसऱ्या शहरातून अनेक महिला नोकरीनिमित्ताने येथे येतात. त्यांना दररोज लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो. अशा नोकरदार महिलांसाठी वसतीगृह उभारणीचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावास ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.
या प्रस्तावानुसार, घोडबंदर येथील भाईंदर पाडा भागातील सुविधा भुखंडावर नोकरदार महिलांसाठी वसतीगृह उभारण्यात येणार आहे. या वसतीगृहासाठी तळ अधिक नऊ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण ४०२ महिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये पुरेशी वाहनतळ व्यवस्था, फुड कोर्ट, व्यायाम शाळेकरीता पुरेशी जागा, या सुविधांचा अंर्तभाव असणार आहे. या नियोजित इमारतीचे बांधकाम क्षेत्र ४५२३ चौ.मी इतके असून इमारत बांधकामाकरीता एकूण ५० कोटी रुपयांचा खर्च आहे. हा निधी देण्याची घोषणा करत या कामासाठी निविदा प्रकिया राबविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार, पालिकेने या वसतीगृहाच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता दिली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475