जिल्हा

मफतलाल कंपनीच्या जागेचा चौथा लिलाव लवकरच

मफतलाल कंपनीच्या जागेचा चौथा लिलाव लवकरच
मफतलाल कंपनीच्या जागेचा चौथा लिलाव लवकरच फोटो: ठाणे वैभव

ठाणे : कर्जवसुली न्यायाधिकरणामार्फत नवीन मूल्यांकन अहवाल सादर झाला असून कळव्यातील मफतलाल कंपनीच्या मालमत्तेचा चौथ्यांदा लिलाव होण्याची शक्यता बंबई मजदूर युनियनचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी व्यक्त केली. ही लिलाव प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर कामगारांची थकीत देणी व प्रॉव्हिडंट फंड मिळवून देण्याचे मार्ग मोकळे होतील. जमिनीची विक्री होत नसल्यामुळे कामगारांची देणी मिळण्यासाठी विलंब होत आहे.

मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज लि. कळवा येथील कामगारांची बैठक मान्यताप्राप्त बंबई मजदूर युनियनचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या उपस्थितीत ठाणे येथे पार पडली. यावेळी कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडासाठी देखील बंबई मजदूर युनियन सातत्याने प्रयत्न करत असून उच्च न्यायालयात आणि केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करीत असल्याचेही श्री. वढावकर यांनी सांगितले.

मे १९८९ ते सप्टेंबर १९९९ पर्यंत म्हणजेच कंपनी बंद झाल्यापासून ते कंपनी अवसायानात (लिक्विडेशन) जाईपर्यंत कामगारांना प्रॉव्हिडंट फंड मिळण्यासाठी बंबई मजदूर युनियनने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता व न्यायालयाने ही मागणी मान्य करून प्रॉव्हिडंट फंड कमिशनरकडे तो वर्ग केला व  त्यांनी त्याबाबत ऑर्डर केली आणि त्यामुळे कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंड देण्यामध्ये वाढ झाली. यापूर्वी दोन वेळा उच्च न्यायालयात आणि एकवेळा कर्जवसुली न्यायाधिकरणामध्ये लिलाव काढण्यात आला होता. मात्र, जमीन खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने आता सदर जमिनीचा चौथ्यांदा लिलाव करण्यात येणार आहे. यावेळी जमीन खरेदी करण्यासाठी एखादा बांधकाम व्यावसायिक पुढे आल्यास, संबंधित कामगारांना त्यांची कायदेशीर देणी व थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

लिलावाच्या प्रक्रियेला अपेक्षित यश मिळाले नाही, तर कामगारांची देणी मिळवण्यासाठी पर्यायी मार्गांचाही विचार करण्यात येत आहे. मफतलाल इंजिनिअरिंगची कळवा येथील जमीन शासनाने ताब्यात घेऊन त्यातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून कामगारांची देणी अदा करता येतील का, हा महत्त्वाचा पर्याय बैठकीत चर्चेला आला. या संदर्भात वढावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर साहेब आणि आमदार निरंजन डावखरे यांना भेटून याबाबत राज्य शासनातर्फे जमीन घेण्याचा प्रस्ताव करून कामगारांची देणी प्रथम मिळवून द्यावी अशी विनंती केल्याचे मफतलाल कामगारांतर्फे श्री.एम.आर.कुळकर्णी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475