जिल्हा
आरटीईच्या पहिल्या यादीत १०,९९६ विद्यार्थ्यांची निवड
आरटीईच्या पहिल्या यादीत १०,९९६ विद्यार्थ्यांची निवड
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ठाण्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत ठाणे जिल्ह्यातील १० हजार ९९६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ज्या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झालेली आहे, अशा बालकांच्या पालकांनी २५ एप्रिलपर्यंत पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले.
आरटीई अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी राबवण्यात येणार्या प्रवेश प्रक्रियेला ठाणे जिल्ह्यात १ मार्च ते २५ मार्च असा कालावधी देण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातून ६२९ शाळा सध्या या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. या शाळांमध्ये आरटीईच्या १२,२६७ जागा उपलब्ध असून, यंदा या जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील ३०,५५७ विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल झाले. यापैकी 10,996 विद्यार्थ्यांची पहिल्या यादीत निवड करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ज्या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झाली आहे, अशा बालकांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएसही आला असेल. त्यांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका अथवा महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्रथम पडताळणी समितीकडून पाल्याचा प्रवेश निश्चित करायाचा आहे. पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी ३० एप्रिलपर्यंत शाळेमध्ये जाऊन बालकांचा प्रवेश घ्यावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करावीत असे सांगण्यात आले आहे.
प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाइलवर एसएमएस प्राप्त झाले असतील. परंतु, फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी आदी सूचना शिक्षण विभागाने पालकांना दिल्या आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका / मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अभियांशी संपर्क साधावा असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
300x450
300x600