अधिकृत पब्लिक ॲप सुरू
ठाणे : नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, विकासकामे, जनजागृती मोहिमा तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अधिक वेगाने, पारदर्शकपणे व विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत पब्लिक ॲप खाते सुरू करण्यात आले आहे.
डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेऊन नागरिकांना अधिकृत माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद, ठाणेने पब्लिक ॲप या लोकप्रिय डिजिटल व्यासपीठावर आपली उपस्थिती नोंदविली आहे. या माध्यमातून विविध विभागांच्या शासकीय योजना, विकासकामे, प्रेसनोट, जनजागृती मोहिमा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, समाजकल्याण, महिला व बालविकास, पाणीपुरवठा, कृषी तसेच इतर विभागांच्या महत्त्वपूर्ण सूचना, निविदा, यशोगाथा आणि आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक माहिती नियमितपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिकृत पब्लिक ॲप खात्यामुळे नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती वेळेत मिळणार असून विविध उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. तसेच अधिकृत स्रोतावरून माहिती उपलब्ध होत असल्याने अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
“डिजिटल माध्यमांच्या युगात नागरिकांपर्यंत शासनाची माहिती जलद, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत पब्लिक ॲप खाते हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरेल. शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि लोकहिताच्या उपक्रमांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत वेळेत पोहोचावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी अधिकृत Public App खाते फॉलो करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि अधिकृत माहितीचाच स्वीकार करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.