ठाणे : युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी नुकताच ठाण्यात केलेल्या युवा सेनेच्या `युवा महाराष्ट्र’ कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेनेच्या वर्तुळात होत आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या सक्षम युवा नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागातील युवा वर्गाला आकर्षित करण्यात पुर्वेश सरनाईक यांना मोठ्या प्रमाणात यश आल्याचीही जोरदार चर्चा आहे. एकूणच राज्याच्या राजकारणात एक युवा नेता म्हणून पुर्वेश सरनाईक यांनी स्थान मिळविले असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेची स्वतंत्र शाखा स्थापन केली. युवा सेनेच्या कार्याध्यक्षपदी पुर्वेश सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली. ठाणे व मीरा-भाईंदर शहरात दांडगा युवा संपर्क असलेल्या पुर्वेश यांनी ही संधी साधून, राज्यभरात युवा सेना पसरविली. कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा विविध विभागांमध्ये युवा सेनेचा नावलौकिक झाला. पुर्वेश सरनाईक यांनी सर्वाधिक प्राधान्य संघटनात्मक बांधणीला दिले होते. शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेतील शेकडो पदाधिकाऱ्यांनीही पुर्वेश यांना साथ दिली. त्यामुळे शिवसेनेला युवा वर्गाची नवी फळी मिळाली. या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांमुळे शिवसेनेची बांधणी मजबूत झाली. त्याचबरोबर मध्यमवयीन व ज्येष्ठ शिवसैनिकांनीही पुर्वेश यांना आपलेसे केले. युवा कार्यकर्त्यांना समजून घेण्याबरोबरच सहज व सोप्या संवादशैलीमुळे पुर्वेश सरनाईकांना कार्यकर्त्यांची पसंती मिळत आहे. त्याची प्रचिती ठाण्यात नुकत्याच झालेल्या मेळाव्यात आली.
या मेळाव्याला विविध भागातील युवांची व उच्चशिक्षित युवकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील रेमंड मैदानावर झालेला नुकताच झालेला भव्य युवा मेळावा यशस्वी झाला. या मेळाव्यात पुर्वेश सरनाईक यांचे नियोजन नेटके होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार शशिकांत धोत्रे, प्रसिद्ध कसोटीपटू अजिंक्य राहणे यांना विशेष पुरस्कार दिला गेला. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही मुलाखत गाजली. संगीतकार अवधूत गुप्ते यांनी विविध मुद्द्यांवर खासदार शिंदे यांना बोलके केले. त्यांच्या प्रेरणादायक मार्गदर्शनाने युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली.
शैक्षणिक मदत कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेनेने सुरू केलेल्या शैक्षणिक मदत कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोचविण्यासाठी ते कार्यरत आहेत. पुर्वेश सरनाईक यांच्याकडून या कक्षाचा दर दोन दिवसाने आढावा घेतला जात आहे. गेल्या २० दिवसांतच शैक्षणिक मदत कक्षाची शैक्षणिक वर्तुळात चर्चा होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये युवा वर्गाला स्थान देण्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षात केलेल्या कार्यामुळे राज्यातील निवडक युवा नेतृत्वात पुर्वेश सरनाईक यांना स्थान मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पुर्वेश यांच्या नावाचा विचार करण्याची मागणी युवा शिवसैनिकांकडून केली जात आहे.