भाईंदर : गुरुवारी सकाळी भाईंदरमध्ये झाड कोसळून स्कूटरस्वार गंभीर जखमी झाला होता. वैद्यकीय उपचारासाठी इस्पितळात दाखल केलेल्या या तरुणाचे शुक्रवारी निधन झाले.
भाईंदर पश्चिममधील राई गावात मुसळधार पावसात घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला असलेले नारळाचे झाड अचानक अंगावर कोसळल्याने राहुल पाटील यांच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. राहुल पाटील हे राईगांवचे रहिवासी असून भूमिपुत्र शिलोत्री संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांचे पुत्र आहेत. राहुल आपल्या स्कूटरमध्ये इंधन भरण्यासाठी जवळच्या पेट्रोल पंपावर गेला होता आणि घरी परत येत असताना नारळाचे झाड अचानक कोसळले आणि ते थेट त्याच्या मानेवर आणि पाठीवर आदळले. स्थानिक रहिवाशांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली, पोलिसांना सतर्क केले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
मीरा-भाईंदर महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, झाडे पडण्याच्या २० घटना घडल्या आहेत. भाईंदर पोलिसांनी घटनेचा अहवाल नोंदवला असून यात निष्काळजीपणाची काही भूमिका होती का?, याचा तपास करीत आहेत.