दोन वर्षांपूर्वी, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे वूमन्स प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामाच्या अंतिम फेरीत मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आमनेसामने आले होते. २०२५ मध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा चॅम्पियनशिप सामन्यासाठी भेटतील.
२०२३ च्या WPL विजेत्या मुंबई इंडियन्सना या आवृत्तीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. परंतु दोन वेळचे फायनलिस्टस दिल्ली कॅपिटल्सना २०२३ च्या WPL फायनलमध्ये त्याच मैदानावर जे घडले ते लक्षात असेल म्हणूनच ते यजमान संघाला हलक्यात घेणार नाहीत.
आमने सामने
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या समोरासमोरच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स ४-३ अशा आघाडीवर आहे. २०२५ च्या वूमन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही वेळा मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.
संघ
मुंबई इंडियन्स: अमनजोत कौर, अमिलिया कर, क्लोई ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जिंतिमनी कलिता, नॅट सिव्हर-ब्रंट, सायका इशाक, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, एस सजना, अमनदीप कौर, कीर्थना बालक्रिष्णन, जी कमलिनी (यष्टीरक्षक), संस्क्रीती गुप्ता, अक्षिता माहेश्वरी, नदिन डी क्लर्क
दिल्ली कॅपिटल्स: ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासन, मारिझान काप, मेग लॅनिंग (कर्णधार), मिन्नू मणी, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), तीतास साधू, ॲनाबेल सदरलँड, एन चरनी, नंदिनी कश्यप (यष्टीरक्षक), सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निकी प्रसाद
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
नॅटली सिव्हर-ब्रंट: नऊ टी-२० डावांमध्ये पाच अर्धशतके झळकावणारी ही इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू WPL २०२५ मध्ये सातत्याने उत्कृष्ट खेळी करत आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या या उजव्या हाताच्या फलंदाजाची सरासरी ७० आहे आणि तिचा स्ट्राइक रेट १५७ आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत तिने आतापर्यंत नऊ बळी घेतले आहेत.
हेली मॅथ्यूज: ती महिला क्रिकेटमध्ये काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे जी फलंदाजी आणि गोलंदाजीची सुरुवात करू शकते. स्पर्धेत १७ बळींसह, ही ऑफ स्पिन गोलंदाज सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज आहे. याशिवाय, ती ३०४ धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मेग लॅनिंग: दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने WPL च्या पहिल्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये तुच्या संघाला फायनलपर्यंत आणले होते. या तिसऱ्या हंगामात देखील तिने तिची कामगिरी चोख बजावली आहे. ऑस्ट्रेलियाची ही माजी कर्णधार अत्यंत स्पर्धात्मक आहे आणि ती नेहमीच जिंकण्यासाठी खेळते. म्हणूनच दिल्ली कॅपिटल्ससाठी फलंदाजीची सुरुवात करताना, या उजव्या हाताच्या फलंदाजावर एक चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असेल. तिने आठ सामन्यांमध्ये २६३ धावा केल्या आहेत, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
जेस जोनासन: ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकी गोलंदाज ही २०२५ च्या वूमन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे, तिने सात सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या गोलंदाजीव्यतिरिक्त, मधल्या फळीतील फलंदाजीत तिचे योगदान उल्लेखनीय आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने पाच डावांमध्ये १३७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये नाबाद ६१ धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: मार्च १५, २०२५
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण: ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
प्रक्षेपण: जिओहॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क