जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात नांदत आहे याचा अभिमान: सरपंच प्रियांका पाटील

कल्याण : जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशात नांदत असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षतेखाली २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या अखंड अविरत परिश्रमातून भारताला हे संविधान मिळवून दिले आहे. संविधानाने भारतीय नागरिकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून दिली आहे, असे प्रतिपादन राहनाळ गावच्या सरपंच प्रियांका पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी केले.
 
जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे राहनाळ गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक राजाराम नाईक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. राहनाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झेंडावंदन करायचे असा निर्णय घेतल्याचे उपसरपंच प्रताप पाटील यांनी जाहीर केले. राहनाळ शाळेला प्रगतीपथावर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रताप पाटील यांनी यावेळी सांगितले. 
 
सकाळी ढोल – ताशा, लेझीमच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. “भारतमाता की जय, प्रजास्ताक दिन चिरायू हो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” च्या घोषणांनी वातावरण निनादून गेले. राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत, संविधानाची उद्देशिका यांचे गायन गेले. 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक अजय पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन अंकुश ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक, माजी सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.