सामाजिक कार्याची आवड असलेल्या शिल्पा वाघ गेल्या ६ ते ७ वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. समाजसेवेच्या समर्पित भावनेतून त्या महिला बचत गटांना पौष्टिक खाद्यपदार्थ, ‘टाकाऊतून टिकाऊ’ वस्तू आणि आयुर्वेदिक साबण तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतात.

साधारण २४-२५ वर्षांपूर्वी मुलांचे संगोपन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडल्यानंतर त्यांनी वागळे इस्टेट येथे वास्तव्यास असताना ‘पोळी-भाजी केंद्र’ सुरू केले. त्यानंतर ऋतू पार्क येथे स्थलांतरित झाल्यावर बदललेल्या जागेमुळे व्यवसायाची आर्थिक गणिते जुळवणे कठीण झाले तरीही त्यांनी हा व्यवसाय मर्यादित स्वरूपात सुरू ठेवला. त्या काळात बेबी सिटिंग हा ट्रेंड फारसा रुजला नव्हता, तेव्हा त्यांनी स्त्रियांना आपल्यासारखी नोकरी सोडून त्याग करायला लागू नये आणि निश्चिंतपणे काम करता यावे या उद्देशाने ‘डे केअर’ सुरू करण्याचा पर्याय निवडला. सोमवार ते शुक्रवार ‘डे केअर’ चालवायचे आणि सुट्टीच्या दिवशी डब्यांच्या ऑर्डर्स घ्यायच्या, अशा व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी १२ वर्षे सातत्य राखले. कोव्हिडच्या काळात त्यांच्या पहिल्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने उभारी मिळाली; घरपोच डबे पोहोचवण्याच्या कामातून त्यांची समाजसेवा आणि व्यवसाय दोन्ही जोमाने सुरू झाले. या व्यवसायाने त्यांना ओळख आणि काम दोन्ही भरभरून दिले. “आपणही समाजाचे देणे लागतो” हा उदात्त हेतू समोर ठेवून आता वयाच्या साठीमधे त्यांनी पूर्णपणे सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे.

शिल्पा वाघ यांनी मिलेट्सपासून (भरड धान्य) ऑनलाइन, ऑफलाईन आणि स्वतः प्रयोग करून काही पौष्टिक पदार्थ बनवण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. आज त्या महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि विविध स्वयंसेवी संस्थांमधील महिलांना भरड धान्याचे महत्त्व पटवून देतात. पारंपरिक भाकरी-पराठ्यांच्या पलीकडे जाऊन मिलेट्स ब्रेकफास्ट, लंच प्रीमिक्स आणि नाचणीची बर्फी यांसारखे नाविन्यपूर्ण पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण त्या देतात. याव्यतिरिक्त, ‘टाकाऊतून टिकाऊ’ या उपक्रमांतर्गत त्या देवाला वाहिलेल्या फुलांपासून, फुलांच्या हारांपासून धूप कांडी आणि दिवे बनवण्यास शिकवतात.

घरकाम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिल्पा वाघ त्यांच्या घरी जाऊन प्रशिक्षण देतात. केवळ पदार्थ शिकवून त्या थांबत नाहीत, तर ऑर्डर्सचे गणित कसे बसवायचे, कच्च्या मालाचे मोजमाप, मार्केटिंग आणि नफ्याचे प्रमाण (Margin) याबद्दल सविस्तर मार्गदर्शन देऊन त्यांना ‘स्टार्टअप’साठी प्रोत्साहित करतात. सध्या त्या ‘कल्पतरू ठाणे’ येथील प्रोजेक्टमध्ये ‘विद्या’ (NGO) संस्थेमार्फत महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असून त्या आहार संबंधी प्रशिक्षण देतात. सामाजिक बांधिलकी जपत त्या दर महिन्याच्या अमावस्येला मुलुंड (योगी हिल्स) येथे १५०० ते २००० अंध गरजूंसाठी होणाऱ्या अन्नदान उपक्रमात श्रमदान/सेवा देतात. “कोणीही उपाशी राहू नये” हेच त्यांचे ब्रीद आहे.
“महिलांकडे प्रतिभा आणि पाककलेचे ज्ञान उपजतच असते, पण त्यांना गरज असते ती व्यवसायाचे तंत्र समजून घेण्याची. त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि प्रेरणा देऊन आत्मनिर्भर करणे हाच माझा ध्यास आहे,” असे शिल्पा वाघ अभिमानाने सांगतात.
प्रियंका माने – एक नवी सुरुवात
आधी बॅक ऑफिसमध्ये नोकरी करणारी मी, आज एक यशस्वी उद्योजिका आहे. ‘आहार’ क्लासमध्ये मला केवळ रवा केक बनवण्याचे कौशल्य मिळाले नाही, तर व्यवसायाचे नियोजन आणि मार्केटिंगचे बारकावेही शिकायला मिळाले. शिल्पा आणि स्वाती मॅडमच्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि आता मी आनंदाने माझा केकचा व्यवसाय चालवत आहे. मला स्वावलंबी केल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
चंद्रावती शेट्टी- गृहिणी ते व्यावसायिक
“माझ्याकडे पिठाची चक्की तर आधीच होती, पण ‘आहार’ क्लासला आल्यावर त्याचे व्यावसायिक रूपांतर कसे करायचे हे मी शिकले. चकली आणि इतर पिठांचे ‘प्रिमिक्स’ तयार करून मी आता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. शिल्पा मॅडमच्या पाठिंब्यामुळे मला मोठी उमेद मिळाली असून, आता मी घरापुरते मर्यादित न राहता ग्राहकांच्या ऑर्डरही घेऊ लागले आहे. ही प्रगती माझ्यासाठी खरंच अभिमानास्पद आहे.
सुजाता जाधव- आत्मविश्वास दुणावला
लॉकडाऊनमध्ये जेव्हा सर्व कामे बंद झाली, तेव्हा मी घरूनच डबे देण्यास सुरुवात केली. विशेषतः माझ्या पुरणपोळ्या आणि दिवाळी फराळाला लोकांकडून मोठी पसंती मिळाली. ‘आहार’ क्लासमधील शिल्पा मॅडमच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणादायी पाठिंब्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या मदतीने मी आता माझ्या व्यवसायाचा विस्तार करत असून, लवकरच स्वतःचे ‘टिफिन सेंटर’ सुरू करण्याचा आमचा मानस आहे. ‘आहार’ क्लासमुळे माझ्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशा मिळाली आहे!