एनएमएमटी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट आकारणार

नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या “महिला सशक्तीकरण” या अभियानाच्या संकल्पनेतून व महिला सन्मानार्थ नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाकडून महिलांसाठी उपक्रमाच्या बसेसधून प्रवास करतांना तिकीट दरात 50टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक नमुंमपा यांनी मंजूरी दिलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे लोकार्पण व भुमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केल्यानुसार महिलांना नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50टक्के सवलत 14 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन दोन लाखाहून अधिक प्रवाशी प्रवास करीत असून त्यामध्ये साधारणतः 40टक्के महिला प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या अंदाजित 80 हजार महिला प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. महिलांनी या प्रवास सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.