महिला पोलिसाला नशेबाजांकडून मारहाण

भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील उत्तन धारावी परिसरात अंमली पदार्थासह इतर मादक पदार्थ विक्री व्यवसाय प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर नशेबाजांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका महिला पोलिसाला लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात महिला पोलीस जखमी झाली आहे.

मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे सध्या अमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात येत आहे. दररोज नशेबाजांची धरपकड करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अमली पदार्थ विरोधी शाखेचे पाच जणांचे पथक रात्री ९ च्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरातील धावगी डोंगर येथे गेले होते.

हे पथक कारवाई करताना १५ ते २० जणांनी पोलिसांशी वाद घालून मारहाण केली. यामुळे पोलिसांना जीव वाचवून माघारी फिरावे लागले होते. यावेळी काही नशेबाजांनी महिला पोलीस हवालदार लता एकलदेवी यांना बांबूने बेदम मारहाण केली. पोलिसांकडे शस्त्र नसल्याने त्यांना प्रतिकार करता आला नाही. या हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी लता एकलदेवी या जखमी झाल्या आहेत.

या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा अब्बास अली मिर्झा (३८) आणि अंकुर भारती (२८) आणि राजू गौतम (१९) या तीन हल्लेखोर आरोपींना अटक केली आहे.