त्रुटी ‘झाडून’ काढणार; यंत्रणा अत्याधुनिक करणार

कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी ठामपा करणार १००० कोटींचा खर्च

ठाणे: शहरात निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी तसेच कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी सध्याची ठाणे महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे. या यंत्रणेतील त्रुटी दूर करून अत्याधुनिक यंत्रणा राबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

सद्यस्थितीत शहरामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी मे.रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज, ऑल इंडिया लोकल सेल्फ गर्व्हमेंट यांनी दिलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार कचऱ्याच्या वजनानुसार प्रति मेट्रिक टन दर निश्चित करुन शहरातील हरीत कचऱ्यासह संपुर्ण कचरा संकलन तसेच कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी सात वर्षे कालावधीसाठी ७६३ कोटीचा खर्च आवश्यक असल्याचे नमूद केलेले आहे. मात्र महापालिकेच्या वतीने याच कामासाठी १० वर्षे कालावधीसाठी १००० कोटींचा निधी खर्च करण्याची तयारी दर्शवली असून यासंदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा पालिका प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे.

झपाट्याने होत असलेले शहरीकरण, शहारत वाढणारे उदयोगधंदे, आयटी हब, मॉल्स, अशा विकासकामांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे ३ ते ४ लक्ष नागरिक बाहेरुन ये-जा करीत असतात. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे १०५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत असून झोपडपट्टी भागातही मोठ्या प्रमाणात ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्मिती होत आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन तसेच वाहतूक करण्यासाठी सध्या घंटागाड्यांची योजना पालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. मात्र ही यंत्रणा अपुरी आणि सक्षम नसल्याने आता अत्याधुनिक आणि नव्याने यंत्रणा निर्माण करण्याचा ठाणे महापालिकेच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे.

सल्लागारापोटी प्रकल्प खर्चाच्या ०.२५% इतका खर्च अपेक्षित असून हा खर्च अडीच कोटींच्या घरात जातो. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

कचरा संकलन आणि वाहतुकीमधील सध्याच्या त्रुटी

अस्तित्वातील घंटागाड्यापेक्षा अधिक घंटागाड्यांची आवश्यकता आहे. घंटागाड्यांमध्ये कचरा संकलनाची अत्याधुनिक व्यवस्था नसल्यामुळे गोळा केलेला कचरा मनुष्यबळाद्वारे घंटागाडीमध्ये भरावा लागतो. शहरातील झोपडपट्टी (स्लम) भागातून गोळा होणारा कचरा एकत्रित करुन पुनश्चः घंटागाडीमध्ये हस्तांतरित करण्यासाठी मनुष्यबळाचा व वेळेचा अपव्यव होत आहे. सद्यस्थितीत लहान आकाराच्या तसेच मोठ्या सहाचाकी अशा सर्वच घंटागाड्या संकलित केलेला कचरा डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन जात असताना वाहतुक कोंडी होते. निर्धारित वेळेत कचरा गाड्यांमधून रिकामा न झाल्याने वेळेअभावी घंटागाड्याना कचरा संकलनाची दुसरी फेरी घेणे कठीण होते. सार्वजनिक रस्ते साफसफाईद्वारे रस्त्याच्या कडेला जमा होणाऱ्या कचऱ्याची वाहतुक करणेकरिता स्वतंत्र व्यवस्था नसल्याने घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरच अवलंबन रहावे लागते. शहरामधील हॉटेल, रेस्टॉरंट या ठिकाणी जमा होणाऱ्या टाकाऊ मास, मासे, मटन यांचे संकलन करणेकरिता तसेच कत्तलखाना व मास, मटण विक्री करणाऱ्या दुकानातील कचऱ्याची वाहतुक करणेकरिता स्वतंत्र वाहतुक व्यवस्था नसल्याने घंटागाड्यांवरच अवलंबून रहावे लागते. सद्यस्थितीत घंटागाडीद्वारे रस्त्यावरील बेवारस मृत जनावरांची विलेवाट लावण्याची सोय नाही. शहरात निर्माण होणारा हरीत कचरा संकलन करणेसाठी स्वतंत्र वाहतुक व्यवस्था उपलब्ध नाही.
संकलित झालेला कचरा वर्गीकरणानुसार वाहतुक करणेकरिता घंटागाडीमध्ये पर्याप्त व्यवस्था नसल्याने वर्गीकरणाचे उद्दिष्ट सफल होत नाही.