नवी मुंबई: सिवूड्स सेक्टर ४४ मधील अमन बिल्डर्स या कार्यालयात बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह याचा १३ जानेवारी रोजी मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला ही हत्या आहे की आत्महत्या याचे गूढ कायम असताना पोलिसांनी ४८ तासाच्या आत या घटनेचा तपास लावला आहे. यात मयत मनोज सिंह याच्या पत्नीनेच प्रियकरासोबत कट रचून हत्या केल्याची तपासात निष्पन्न झाले आहे.
मनोज सिंह हा बांधकाम व्यासायिक होता. त्याच्या विरोधात अनेक तक्रारी असून सहा प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. या प्रकरणांत करोडो रुपयांची देणी अदा करायची असल्याने नंतर आपल्या हाती काहीच राहणार नाही म्हणून मनोज सिंह यांच्या पत्नीने राजू उर्फ शमसुल अबूहुरैरा खान या आपल्या 22 वर्षीय प्रियकरासोबत दीड महिन्यापूर्वी खून करण्याचा कट रचला.
मनोज सिंह आपल्या कार्यालयात एकटा असतो, हे माहीत असल्याने शुक्रवारी रात्री उशिरा संधी साधून या दोघांनी मनोज सिंह याचा खून केला. त्यांनी कार्यालयातील सी सी. टिव्ही संच देखील गायब केले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता कार्यालयातील सीसीटिव्ही कॅमेरे काढून नेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संशयाला अधिक वाव मिळाला, त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मनोज सिंह याच्या पत्नीचा जबाब नोंदवल्यानंतर संशय गडद झाला. त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी राजू उर्फ शमसुल अबूहुरैरा खान याला अटक केली असून न्यायालयाने त्यास १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सिंह याच्या पत्नीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.