आमदारांचे पथक सज्ज,
पोलिसांनीही थोपटले दंड
ठाणे: ठाणे शहरातील तरुण पिढी उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लरविरोधात आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांचे पथक सज्ज केल्याचे वृत्त पसरताच ठाणे पोलीस सावध झाले आहेत. थेट मंत्रालय स्तरावर यांचे पडसाद उमटले असून वरिष्ठांच्या आदेशानुसार ठाणे पोलिसांनी कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाणे शहरात बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू असून यात तरुण मुले उद्ध्वस्त होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केल्या होत्या. गेल्या दीड वर्षांपासून आमदार केळकर या विरोधात स्थानिक पोलिसांपासून अधिवेशनात आवाज उठवत आहे. हुक्का पार्लरमुक्त ठाणे या चळवळीला नगारिकांचा पाठिंबा वाढत आहे.
दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर पुन्हा हे पार्लर सुरू होत आहेत. यावर उपाय म्हणून आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांचे पथक स्थापन केले आहे. हे पथक सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर धाडी टाकणार आहे. या बाबतचे वृत्त झळकल्यानंतर मंत्रालय स्तरावर याची चर्चा सुरू झाली आणि थेट वरिष्ठांकडून ठाणे पोलिसांना पार्लरवर कारवाईचे आदेश दिल्याचे कळते.
कार्यकर्त्यांचे पथक बेकायदा हुक्का पार्लरवर धाडी टाकणार असेल तर पोलीस काय करणार अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. तर ठाणे पोलिसही ठाणे महापालिकेच्या मदतीने या पार्लरवर कारवाई सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे कळते.