वेबसाईट ठाणे पालिकेची अन् मतदार यादी नवी मुंबईची

निवडणुक विभागाच्या अजब कारभाराची मनसेकडून पोलखोल

ठाणे: मतदार याद्यामधील घोळाविरुद्ध दोन दिवसांपूर्वी मनसेने पालिका मुख्यालयात धडक मारली होती. तरीही विविध घोळ सुरूच असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ठाणे महापालिकेच्या अधिकृत (वेबसाईट) संकेतस्थळावर चक्क नवी मुंबईतील मतदार यादी प्रसिद्ध केली होती. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा भंडाफोड करून निवडणुकाच पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुक यंत्रणेकडून मतदार याद्यामध्ये करण्यात आलेल्या घोळाविरोधात मनसेने थेट पालिका मुख्यालयावर धडक मारून मतदार याद्या फाडल्या होत्या. तसेच, मतदार याद्या विरोधात हरकती घेण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभुमीवर मतदार याद्यांमधील नवनवीन घोळ समोर येत आहेत. निवडणुक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच कार्यालयात बसुन मतदार याद्या बनवल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला. ठाणे महापालिकेच्या अधिकृत (वेबसाईट) संकेतस्थळावर चक्क नवी मुंबईतील मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. निवडणूक विभागाच्या या भोंगळ कारभारावर मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संतापजनक प्रकारामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा घोळ समोर आला आहे. तेव्हा, आगामी पालिका निवडणूका अशा पद्धतीने होणार असतील तर या निवडणुकाच पुढे ढकला, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. दरम्यान झालेली चूक लक्षात येताच ठाणे महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आणि संकेतस्थळावरील नवी मुंबईतील मतदार यादी काढून टाकण्यात आली. दरम्यान, वेबसाईटवरील तांत्रिक गोंधळाला कंत्राटदार कंपनी जबाबदार आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुक मतदार यादी संदर्भातील काम पुण्याच्या मे.अल्टिमेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कंपनीला देण्यात आले आहे. संबधित त्रुटी संदर्भात या कंपनीला प्रशासनाकडून नोटीस बजावुन खुलासा मागवण्यात आला आहे. अशी कबुली ठाणे महापालिकेचे निवडणुक निर्णय अधिकारी बाळु पिचड यांनी दिली आहे.