ठाण्यात पंधरा दिवसातून एकदा पाणी बंद

ठाणे: तांत्रिक अडचणी आणि पाऊस कमी होईपर्यंत ठाणे शहरात झोनिंग पद्धतीने १५ दिवसातून एकदा प्रत्येक विभागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे पंपिंग केंद्र येथे नदीतून येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या व गाळ आहे. त्याचा पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, पिसे आणि टेमघर येथील वीज पुरवठा खंडित होणे, विद्युत जनित्रात तांत्रिक बिघाड होणे या घटनांमुळे शहरास आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मंगळवार १ ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होईपर्यंत शहरात तात्पुरत्या स्वरूपात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानुसार, पंधरा दिवसातून एकदा एकेका विभागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येईल.

नागरिकांनी या काळात आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा. पाणी काटकसरीने तसेच, गाळून व उकळूनच वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

विभागवार पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे वेळापत्रक

सोमवारी ब्रम्हांड, बाळकुम विभागात सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. मंगळवारी घोडबंदर रोड, दुपारी १ ते सायंकाळी ५, बुधवारी गांधीनगर, सकाळी ९ ते रात्री ९, गुरूवारी उन्नती, सुरकरपाडा, सिद्धाचल, सकाळी ९ ते रात्री ९, शुक्रवारी मुंब्रा-रेतीबंदर, सकाळी ९ ते रात्री ९, शनिवारी समता नगर, सकाळी ९ ते रात्री ९, रविवार, दोस्ती आकृती, सकाळी ९ ते रात्री ९, सोमवारी जेल, सकाळी ९ ते रात्री ९, मंगळवारी जॉन्सन-इटरनिटी, सकाळी ९ ते रात्री ९, बुधवारी साकेत-रुस्तमजी, सकाळी ९ ते रात्री ९, गुरूवारी सिद्धेश्वर, सकाळी ९ ते रात्री ९, शुक्रवारी कळवा-खारेगाव-आतकोनेश्वर नगर, सकाळी ९ ते रात्री ९, शनिवारी इंदिरा नगर, सकाळी ९ ते रात्री ९ आणि रविवारी ऋतूपार्क भागात सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.