जलवाहिन्या टाकल्या, पाणी वाढवले, पाण्यासाठी रांगा मात्र कायम!

दिव्यात पाण्यावरून राजकीय घमासान

ठाणे: दिवा भागातील पाणी पुरवठ्यात वाढ करत नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी या भागात पाणी टंचाईची समस्या कायम असल्याची बाब समोर आली आहे.

पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी महापालिकेच्या निषेधार्थ मडके फोडो आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच टँकरलॉबी चालावी म्हणून काही स्थानिक शिवसेना नेत्यांकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित करत ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईला पालिका प्रशासन आणि मनमानी करणारे शिवसेनेचे स्थानिक नेते जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्यास शिवसेनेनेही प्रतिउत्तर देत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका केली आहे. यानिमित्ताने दिव्यात शिवसेना आणि भाजप मित्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

दिव्यात मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत असल्याने पाणी टंचाईची समस्याही भेडसावत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी येथील पाणी पुरवठ्यात वाढ करण्याबरोबरच मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली. यानंतर येथील पाणी टंचाईची समस्या कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र याठिकाणी पाणी टंचाईची समस्या आजही कायम असल्याची बाब समोर आली आहे.

दिवा शहरातील अनेक भागांमध्ये दोन ते तीन दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. काही भागांना पाणीही मिळत नाही. भर पावसात दिव्यात टँकरद्वारे नागरिकांना पाणी घ्यावे लागते. टँकर लॉबी चालावी म्हणून दिव्यातील काही स्थानिक शिवसेना नेत्यांकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात आहे का? असा प्रश्न भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दिवा शहरातील नागरिकांना पाणी देयके भरूनही पाणी मिळत नाही. भर पावसात दिवा शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. नागरिकांचा प्रत्येक सुट्टीचा रविवार हा पाणी ‌‌वाहिन्या तपासणी करणे आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जातो. पावसाळ्यात अशी परिस्थिती असेल तर अन्य दिवसात येथील नागरिकांना किती यातना होत असतील असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

महापालिका प्रशासन दिव्यातील पाणी समस्या सोडवण्यात पूर्णतः अपयशी ठरले असून या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर मडके फोडो आंदोलन करणार येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

तर यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दिवा, साबे या परिसरात पाण्याचा दाब वाढला आहे. बीआरनगर, बेडेकरनगर भागातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात आहे. मुंब्रा देवी भागात जलवाहीन्या टाकण्याची कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे कुणाला उत्तर देण्यापेक्षा आम्ही आमचे काम करीत आहोत. त्यांच्याकडून कामे होत नाहीत म्हणून लोक त्यांच्याकडे जात नाहीत. लोक आमच्याकडे येत आहेत,याचे त्यांना दु:ख होत आहे, असा टोला दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी दिला आहे.