उल्हासनगर: महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे वॉलमन हे पाणी सोडण्यासाठी गेले असता दोघांनी गैरकायद्याची मंडळी जमवून वॉलमनला मारहाण केल्याची घटना आज सकाळी उल्हासनगरातील गोलमैदान येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली आहे. या प्रकरणी चार महिलांसह एका पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेचे वॉलमन बाबलूकुमार भैश्यकियार आणि अविनाश बाविस्कर हे गोलमैदान येथील पाण्याच्या टाकीजवळ पाणी सोडण्यासाठी गेले असता, पुष्पा पवार, किशोर शेळके आणि त्यांचेसोबत असलेल्या तीन महीला यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आम्ही सांगू तेव्हाच पाणी सोडावे लागेल, असे म्हणाले. त्यावेळी वॉलमननी आम्ही ठरलेल्या वेळेतच पाणी सोडणार असे सांगितले असता त्याचा राग येऊन पुष्पा पवार हिने अविनाश बावीस्कर यास शिवीगाळ करून चप्पलेने मारहाण केली तसेच किशोर शेळके याने बाबलूकुमार याला मारहाण करून धमकी दिली. इतर तीन महिलांनी शिवीगाळ करून अंगावर धावून आल्या.
याप्रकरणी बाबलूकुमार याने दिलेल्या तक्रारीवरून पुष्पा पवारसह चार महिलांवर आणि किशोर शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव राठोड पुढील तपास करत आहेत.