मुंबई: विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेसाठी ११ टप्प्यात मागविण्यात आलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या असून आता हा प्रकल्प ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर उभारण्यासाठी गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘त्यामुळे आता निधी उभारणीची एमएसआरडीसीची चिंता दूर झाली आहे. दुसरीकडे भूसंपादनासाठी लागणारे ३७ हजार ०१३ कोटी रुपये कर्ज स्वरूपात उभारण्यासाठी राज्य सरकारने कर्जहमी देऊन ही अडचणही दूर केली आहे.
‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वानुसार प्रकल्प उभारण्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत. येत्या दीड-दोन महिन्यांत या निविदा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भूसंपादनाला वेग देण्यात येणार असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
नवघर-बलवली मार्गिकेच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्याअंतर्गत ११ पॅकेजमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला. मेघा इंजिनीयरिंग, नवयुग इंजिनीयरिंग, ॲपको इन्फ्रा, अफकाॅन इन्फ्रा, जे. कुमार, एल. ॲण्ड टी., पीएनसी इन्फ्रा, जी. आर. इन्फ्रा आदी कंपन्यांकडून ११ पॅकेजसाठी एकूण ३३ निविदा सादर झाल्या होत्या. मात्र १९ हजार ३३४ कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी अंदाजे ३६ टक्के अधिक दराने निविदा सादर झाल्या. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च थेट २६ हजार ३०० कोटी रुपयांवर पोहोचला. अधिक दराने सादर झालेल्या निविदा, वाढलेला खर्च यामुळे एमएसआरडीसीवर टीका झाली. त्यामुळे या प्रकल्पाच्या निविदा अंतिम झाल्याच नाहीत.
काही महिन्यांपूर्वी एमएसआरडीसीने निविदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. या प्रस्तावानुसार प्राप्त निविदा रद्द करून हा प्रकल्प ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर राबविण्याची परवानगी मागितली. भूसंपादन आणि बांधकामाचा एकूण खर्च ५५ हजार कोटींच्या पुढे जात आहे. इतका निधी उभा करणे शक्य नाही. त्यामुळे हा प्रकल्प ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर राबविण्याची परवानगी एमएसआरडीसीने सरकारकडे मागितली होती.
या प्रकल्पासाठी १३४७ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम दोन टप्प्यात करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यानुसार नवघर-बलवली दरम्यानचा ९८ किमी लांबीचा पहिला टप्पा, तर बलवली-अलिबाग दरम्यानचा २९.९ किमी लांबीचा दुसरा टप्पा असणार आहे.