काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारही नाराज
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विधिमंडळ गटाबाबत केलेल्या वक्तव्यावर आज विधानसभेत रणकंदन झाले. सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन हक्कभंग समितीची निवड केली आहे. या समितीच्या प्रमुखपदी भाजप आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत अतुल भातखळकर, नितेश राणे यांचाही समावेश आहे.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे आज विधिमंडळ अधिवेशनात पडसाद उमटले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनीदेखील संजय राऊत यांचं विधान योग्य नसल्याचे म्हटले होते. सत्ताधारी पक्षाने घेतलेला आक्रमक पवित्रा लक्षात घेता, विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समिती नेमली असल्याचे म्हटले जात आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थापन केलेल्या हक्कभंग समितीत 15 सदस्यांचा समावेश आहे. आमदार राहुल कुल हे या समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्याशिवाय, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भुसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जयस्वाल हे आमदार या समितीचे सदस्य असणार आहेत. या समितीत ठाकरे गटाच्या एकाही आमदाराचा समावेश नाही.
विधानसभेच्या हक्कभंग समितीकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची चर्चा आहे. संजय राऊत हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनीदेखील कारवाईला सामोरे जाण्याचे संकेत दिले आहेत.
विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार हा सभागृहाला असतो. अवमान करणारा व्यक्ती स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. जर संबंधित व्यक्ती सभागृहाबाहेरील असेल तर त्याला तुरुंगवासापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा समज देऊन सोडून दिले जाऊ शकते.