मोठी जीवितहानी टळली
नवी मुंबई: येथील पावणे एमआयडीसी परिसरात एका कंपनीत डोंगरावरील मातीचा मलबा खाली उतरल्याची घटना मंगळवार ९ जून रोजी घडली आहे. या घटनेत दोन ते तीन गाड्या दबल्या असून एका गाडीला बाहेर काढण्यात यश आले. या घटनेने येथील कामगारांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
पावसाळा सुरु झाला की डोंगर पायथ्याशी भूस्खलन होण्याच्या घटना घडत असतात. मात्र अशीच भूस्खलनसदृश घटना नवी मुंबईत घडली आहे. येथील भुखंड क्रमांक पी ए पी ३८ व ३९, पावणे एमआयडीसी या कंपनीत एक मातीचा मोठा मलबा मंगळवारी दुपारी कंपनी आवारात डोंगरावरून खाली आल्याने मोठी दुर्घटना घडली. संपूर्ण मातीचा ढिगारा कारखान्याच्या आतमध्ये घुसला असून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.
ही घटना समजताच एमआयडीसी व नवी मुंबई महानगर पालिका अग्निशमन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या घटनेत दोन तीन गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या असून एका गाडीला बाहेर काढण्यात यश आले आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत माती काढण्याचे काम सुरू होते.
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण माती बाहेर काढल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. हा मलबा कशाचा आणि तो खाली कसा उतरला हे तपासाअंती स्पष्ट होईल, अशी माहिती टीबीआयएचे अग्निशमन अधिकारी सुरेंद्र चौधरी यांनी दिली.