वसई-भाईंदर ९० मिनिटांचा प्रवास होणार १० मिनिटांत!

‘डबल डेकर’ पुलाचा प्रस्ताव सादर

भाईंदर: मीरा रोड ते विरार मेट्रो लाइन 13च्या मार्गावर एक डबल डेकर पूल उभारण्याची योजना आखली जात आहे. भाईंदर आणि वसई शहराला जोडणाऱ्या या पुलामुळे 90 मिनिटांचा प्रवास केवळ 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. आता एमएमआरडीएने यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली असून राज्य सरकारकडे गेल्या आठवड्यात एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे.

सन 2000 मध्ये पहिल्यांदा वसई ते भाईंदर पुलाची योजना मांडण्यात आली होती. त्यानंतर 2023 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. आता 13 वर्षे उलटून गेली असून या प्रकल्पाच्या कामाला काही सुरूवात झालेली नाही. या योजनेनुसार वसईच्या खाडीवर, मेट्रो मार्गिकेवर डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. सर्वात खाली रस्ता, त्यावर मेट्रो लाइन 13चा मार्ग आणि सर्वात वरच्या स्तरावर पूल बांधण्यात येणार आहे.
सध्या भाईंदर ते वसई प्रवासात 39 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. हा पूल तयार झाला तर हे अंतर अवघ्या पाच किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरून थेट 10 मिनिटे होण्याची शक्यता आहे. यामुळे वसई-विरारमधील लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या पुलासाठी एकूण अंदाजित खर्च 2,500 कोटी रुपये असेल. सध्या वापरल्या जाणाऱ्या 39 कि.मी. लांब मार्गासाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

वसई-विरारचे माजी महापौर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी 5 वेग वेगळ्या सरकारी यंत्रणांकडून मंजुरी मिळणं आवश्यक आहे. यापैकी महाराष्ट्र सागरी मंडळ, भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. पंरतु, या प्रकल्पासाठी खारफुटीची जमीन आणि मिठागरांची जमीनही संपादित करावी लागणार आहे. त्यामुळे वन विभाग आणि केंद्र सरकारच्या मीठ आयुक्तांकडून मंजुरी शिल्लक आहे. गेल्या आठवड्यात याबद्दल बैठक पार पडली असून पालघरचे जिल्हाधिकारी, एमएमआरडीएचे आयुक्त, महसूल सचिव आणि कोकण विभागीय आयुक्तांचा समावेश होता. वसई-भाईंदर पुलासाठी मिठागरांची जमीन संपादित करण्यापूर्वी या जमिनीवर राहणाऱ्या मीठ उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. 2013 मध्ये या जमिनीवर राहणाऱ्या 10 कुटुंबांनी जमिन त्यांच्या मालकीची असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण त्या जमिनींच्या नुकसान भरपाईचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे.

प्रस्तावित पूल मुंबई-वसईपासून थेट गुजरातपर्यंत एक दुवा म्हणून काम करेल. सध्या वसई आणि भाईंदरदरम्यान कोणताही थेट मार्ग नाही. प्रवाशांना केवळ रेल्वेमार्गे प्रवास करावा लागतो. रस्तेमार्गे प्रवास करताना राष्ट्रीय महामार्ग ४८चा वापर करावा लागतो. हा मार्ग इतकी रहदारी हाताळू शकत नाही, त्यामुळे मार्गावर सतत वाहतूक कोंडी होते.

हा प्रस्तावित पूल रेल्वे ट्रॅकच्या पश्चिमेकडून बांधला जाणार आहे. मुर्धा गाव येथील नेताजी सुभाषचंद्र मैदानाजवळील उत्तन रोडपासून हा पूल सुरू होईल. पुढे भाईंदरमधील मिठागराच्या जमिनीवरून पणजू बेटाला जोडून वसईच्या खाडीवरून पुढे नायगाव येथे खाली उतरेल. नायगावच्या कुटिन्हो रोडवर हा पूल संपणार आहे.