सुरेश सोंडकर/ठाणे
ठाणे परिवहन सेवेचे शहरातील बहुतांशी बसथांबे रिक्षाचालकांनी ताब्यात घेतले असून जागेअभावी बस पुढे निघून जात आहेत तर ती पकडण्यासाठी प्रवासी मागे धावत असल्याचे संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे.
ठाणे परिवहन सेवेचे प्रवासी खासगी बसचालक घेत असल्याने सेवेला दररोज तोटा सहन करावा लागत आहे. सिटीफ्लो नावाच्या पांढऱ्या रंगाच्या बस आणि इतर खासगी बस निर्धास्त आणि बेकायदेशीरपणे बस थांब्यावर उभ्या राहून प्रवासी घेत असतात आणि मागून येणाऱ्या टीएमटीच्या बस प्रवासी नसल्याने नाइलाजाने चाक (हात) हलवत पुढे निघून जातात. असेही चित्र पाहायला मिळत आहे.
शहरात परिवहन सेवेचे ९२ रूट असून सुमारे ८५० थांबे आहेत. बातमीतील छायाचित्रात दिसत असलेला थांबा हा तीन हात नाका येथील घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील आहे. अशा बहुतांशी थांब्यांसमोर रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे परिवहनच्या बसला उभे राहण्यासाठी जागा मिळत नाही. त्या पुढे निघून गेल्या की प्रवासी त्या बसमागे धावू लागतात. काही ठेचकाळतात तर काहींची फजिती होते. बाजूला उभे असणारे वाहतूक पोलीस मला काय त्याचे या अविर्भावात पहात नजर दुसरीकडे वळवतात.
परिवहन समितीचे सभापती विलास जोशी म्हणतात, याबाबत वारंवार वाहतूक पोलिसांना पत्रे दिली, पण पोलीस ऐकतच नाहीत. ज्ञानेश्वर नगर येथील बस थांब्यासमोर तर रिक्षाचालकांची दादागिरीच सुरू असते. खासगी बसवाले बेकायदेशीरपणे परिवहनचे प्रवासी वाहतूक पोलिसांच्या देखत पळवतात. पळवतात. प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही डोळे झाकून घेतात. या बस थांब्यांचे ग्रहण सुटावे यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, पण वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रशासन सहकार्य करत नसल्याचेही जोशी म्हणाले.
परवा आमदार संजय केळकर यांच्या बैठकीत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विनय राठोड उपस्थित होते. त्यांच्या कानावरही ही बाब घातली आहे. अशा रिक्षाचालकांमुळे वाहतूककोंडी तर होतेच पण परिवहनचेही नुकसान होत असल्याची माहिती परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील यांनी दिली.
एकूणच परिवहनला कुणी वाली उरलेला नाही आणि संबंधित प्रशासनही समस्या सोडवण्यात स्वारस्य दाखवत नाहीत. त्यामुळे बस थांब्यापुढे रिक्षांच्या रांगा आणि जागा नसल्याने पुढे निघून जाणाऱ्या परिवहनच्या बस आणि पैसे वाचवण्यासाठी त्यामागे धावणारा सर्वसामान्य प्रवासी हे चित्र पाहणेच आता हाती उरले आहे, अशी उद्विग्नता जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.