श्रीरंग विद्यालयात अध्यापनाला नवी धार देणारा ‘वाचन कट्टा’ सज्ज

ठाणे : शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी व ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने  श्रीरंग शिक्षण संस्थेच्या श्रीरंग विद्यालय ठाणे येथे शिक्षक वाचन कट्ट्याचे उद्घाटन झाले. रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन व श्रीरंग शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी रोटेरियन हर्ष मकोल, रोटेरियन चंद्रकांत कारोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. निसर्गसदृश वातावरणात उभारण्यात आलेला ‘वाचन कट्टा’ माहितीपूर्ण फलक व निवडक पुस्तकांच्या देखण्या मांडणीमुळे विशेष आकर्षण ठरला.
या कट्ट्यावर शैक्षणिक संदर्भ ग्रंथ, शिक्षण विषयक मासिके, बालमानसशास्त्र, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा व विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. शिक्षकांनी एकत्र येऊन वाचन, चिंतन व संवाद साधावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी हा रिडिंग झोन साकारण्यात आला असून, ही संकल्पना संस्थेचे खजिनदार महेश भोसले आणि मिलिन्द बल्लाळ यांची आहे.
ठाणेवैभव वृत्तपत्राचे संपादक तसेच संस्थेचे पदाधिकारी मिलिन्द बल्लाळ यांनी शिक्षकांशी संवाद साधत वाचन संस्कृतीचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले व स्वलिखित पुस्तके विद्यालयास भेट म्हणून प्रदान केली.
व्यवस्थापनाने माध्यमिक विभागातील चित्रकला शिक्षक भूषण सुतार यांच्या संस्थेच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी केलेल्या परिश्रमांची विशेष दखल घेत त्यांचा गौरव केला. यावेळी सर्व समिती सदस्य व पदाधिकारी, तसेच नामवंत चित्रकार दिलीप वैती उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन यांनी विद्यालयाच्या भावी उपक्रमांसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.