उत्तन सागरी सेतूचे हलले गाडे; मेट्रोची सहा स्थानके पूर्णत्वाकडे

ठाणे: मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील महानगरे आता मेट्रो, भुयारी मार्ग, उड्डाणपूल यामुळे अधिक जवळ येऊ लागली आहेत. एकीकडे ठाणे, कल्याण आणि भिवंडी मार्गावरील मेट्रोची सहा स्थानके पूर्णत्वाकडे जात असतानाच महत्वाकांक्षी उत्तन-विरार सागरी सेतुला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

एमएमआरडीएच्या महाकाय मेट्रो प्रकल्पातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या प्रकल्पांमधील सहा स्थानकांची कामे 80 टक्क्यांहून पुढे सरकली आहेत तर कशेळी कारशेडचीही उभारणी झाली आहे.

ठाणे ते भिवंडी हा 12:30 किलोमीटरचा पहिला टप्पा असून प्रवासी सेवा लवकर सुरू करण्याचा प्रयत्न एमएमआरडीए करत आहे, अशी माहिती ‘एमएमआरडीए’मधील वरिष्ठ सूत्रांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.

८ सप्टेंबर 2023 पर्यंत या मार्गिकांचे 80 टक्के काम पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. परंतु, ठाणे मेट्रोची धाव अजूनही सुरू झालेली नाही.

दुस-या टप्प्यातील अडथळे लक्षात घेता कशेळी येथे कारशेड उभारण्यात येणार आहे. यासंबंधीची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली होती. कारशेड या स्थानकालगत ही प्रक्रिया जवळ आल्याने पहिला टप्पा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, असेही सूत्रांनी सांगितले होते. मात्र ते काही तांत्रिक कारणास्तव शक्य झाले नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी तब्बल 8417 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे तर बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजुरफाटा आणि धामणकर नाका ही सहा स्थानके या ठाणे मेट्रो प्रकल्पात सामावली आहेत.

भिवंडी ते कल्याण या दुस-या टप्प्यात राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर टेमघरपर्यंत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचा प्रश्न असल्यामुळे धामणकर नाका ते टेमघर या साडेतीन किलोमीटर अंतरात मेट्रो सुविधा भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तन ते विरार या प्रस्तावित बहुउद्देशीय सागरी सेतूला शिंदे मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर एमएमआरडीएमध्ये मेगा कनेक्टिव्हिटी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरारला थेट जोडण्यासाठी ४३ किमी लांबीचा वर्सोवा-विरार सी लिंक बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएने सादर केलेल्या पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरार हा सागरी पूल बांधण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर हा सागरी पूल बांधण्यात येणार आहे.