झोपडीधारकांना स्मार्ट दिलासा
ठाणे: स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट मीटर बसवणार्या झोपडीधारकांना यापुढे सरसकट शून्य ते २० हजार लीटरपर्यंत कितीही पाणी वापरले तरी सात रुपये ५० पैसे एवढाच दर आकारण्यात येणार आहे. परिणामी महिना २५८ रुपये आणि वर्षाला तीन ते पाच हजार रुपये पाणीपट्टी कमी होणार आहे. म्हणजे झोपडीधारकाला किंवा चाळीत राहणार्या प्रत्येक कुटुंबाला आता प्रति महिना १३० रुपये म्हणजे वर्षाला दिड हजारांपर्यंतच पाणी बील येणार आहे.
गेल्या सात वर्षांमध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एक लाख १३०२८ मिटरपैकी आतापर्यंत एक लाख २६८ इतके मिटर बसवण्यात आले आहेत. यामध्ये इमारतींमध्ये ३०,१०१, व्यावसायिक कंपन्यांमध्ये ५,३४३ तर झोपडपट्टी भागांमध्ये ६४,८२४ मीटर बसवण्यात आले आहेत. त्यापैकी ७२ हजार मीटरना जलमापकांच्या नोंदीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये देयके देण्यात आली आहेत. वापरलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे पैसे मोजावे लागत असल्याने अनेकांना ही बीले अवाक्याबाहेर भासू लागली आहेत. याबाबत २५ जून रोजी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत झोपडीधारकांना पाणीपट्टीत दिलासा देण्याचा निर्णय घेत झोपडीधारकांना सर्व युनिटसाठी साडेसात रुपये दर देण्याचा निर्णय झाला आहे.
वास्तविक स्मार्ट मीटर बसवण्याआधी प्रत्येक कुटूंबाला प्रति महिना १३० रुपये याप्रमाणे १,५६० रुपये वार्षिक पाणीपट्टी येत होती. मीटर बसवल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला साडे सात रुपये ते २० प्रति हजार लिटर दरान्वये पाण्याच्या वापरानुसार ही रक्कम वाढून महिन्याला २५८ रुपये तर वर्षाला तीन ते पाच हजार येत आहे. इमारती आणि झोपडीधारकांना एकाच न्यायानुसार ही बीले अदा होत होती. इमारती किंवा गृहसंकूलांमध्ये राहणार्या रहिवाशांमध्येही याबाबत नाराजीचा सूर होता. पण तरीही त्यांच्याकडून नियमित पाणीपट्टी भरली जात आहे. पण झोपडपट्टी भागात नवीन दरानुसार पाणीपट्टी वसुलीचे मोठे आव्हान ठाकले आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षातील फ्लॅट रेट पद्धतीची देयके तयार करून वितरीत करण्यात आली आहेत. स्मार्ट मीटर बसवलेल्या एक लाख २६८ इतक्या मीटरपैकी ९१ हजार नोंदीनुसार पाणी देयके देण्यात येणार आहेत. पण २५८ रुपये इतके पाणी बील येत असल्यामुळे झोपडीधारकांमध्ये अनास्था आहे. त्याचा परिणाम पाणीपट्टी वसुलीवर होत आहे.
झोपडट्ट्यांना पाणीपट्टीत दिलासा मिळाला असला तरी फ्लॅटधारकांना नियमानुसार बील भरावेच लागणार आहे. महासभेच्या ठरावात इमारतींना व्हॉल्युमॅट्रिक पद्धतीने टेलिस्कोपिक दर आकरण्याची मान्यता देण्यात आली. याच पद्धतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पाणी देयके देण्याच्या सुचना आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. त्यामुळे फ्लॅटधारक आणि व्यवसायिक अस्थापने या पाणीसवलतीपासून दूर राहणार आहेत.
असा असेल दर
पाण्याचा खप पूर्वीचे दर सुधारित दर
(प्रति कुटुंब, महिना) इमारती झोपडपट्टी
० ते १५००० ली. ७.५० रुपये ७.५० रु. ७.५० रु.
१५००० ते २००००ली. १० रुपये १०.०० रु. ७.५० रु.
२०००० ते २४००० ली. १५ रुपये १५.०० रु. ७.५० रु.
२४ हजार ली. पुढे २० रुपये २०.०० रु. ७.५० रु.