अनधिकृत शाळा आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे साटेलोटे?

आमदार संजय केळकर यांनी केली पोलखोल

ठाणे: दिव्यातील अनधिकृत शाळांनी विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली असून या शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नाहीत. शिक्षणाधिकारी आणि या शाळांच्या संचालकांचे साटेलोटे आहे का? असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला.

ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळा बंद करून जवळील शाळांमध्ये त्यांना प्रवेश देण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील अनधिकृत शाळांबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी थेट शिक्षणाधिकारी आणि अनधिकृत शाळांमध्ये संगनमत आहे का असा प्रश्न उपस्थित करून शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिवा प्रभाग समितीमध्ये ४५ अनधिकृत शाळा आहेत. त्यांना सुमारे २९ कोटींच्या दंडाच्या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. मात्र या नोटिसांकडे दुर्लक्ष करत दंड भरण्यास या शाळा संचालकांनी नकार दिला आहे. तर दुसरीकडे या शाळांनी विद्यार्थ्यांना खोटे दाखले देवून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केल्याचेही श्री.केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नसून शिक्षणाधिकारी आणि या शाळा संचालकांमध्ये संगनमत झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित करत या शाळांना तातडीने बंद करण्याची नोटीस शिक्षणाधिकाऱ्यांना बजावण्यात यावी, अशी मागणी आ.केळकर यांनी सभागृहात केली.