मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली वन अधिकाऱ्यांची भेट
ठाणे: मुंब्रा डोंगरावर अनधिकृत दर्गे उभारल्याचे मनसेने उघडकीस आणल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने आज वन अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली तर लवकरच डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंब्रा डोंगरावर असलेल्या अनधिकृत बांधकामांची वनविभागाकडून पाहणी करण्यात आली. मात्र, मशिद व दर्ग्याचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करण्यात यावी यावर मनसे ठाम असून डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात यावीत. यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने सोमवारी ठाणे उपवनसंरक्षकांची भेट घेतली.
शिवाजी पार्क येथील मैदानात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगली आणि मुंबईतील समुद्रात उभारण्यात आलेल्या अनधिकृत मजारचे वास्तव समोर आणले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने दोन्ही ठिकाणी कारवाईचा बडगा उगारत दोन्ही मजार हटवण्यात आल्या. त्यानंतर राज्यभर मनसैनिकांनी आपापल्या विभागातील अनधिकृत दर्गे, मशिदीविरोधात आवाज उठवला होता. ठाणे शहर मनसेनेही दोन दिवसांपूर्वी मुंब्रा डोंगरावरील अनेक बेकायदा दर्ग्याचा पर्दाफाश करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
ही जागा वनविभागाची असल्याने मनसेच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने तातडीने मुंब्रा डोंगरावरील बांधकामांची पाहणी केली होती. मात्र, कारवाईचा बडगा न उगारल्याने सोमवारी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे व मनसैनिकांच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांची भेट घेतली. या भेटीनंतर वनाधिकाऱ्यानी मुंब्रा डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासित केल्याचे मोरे यांनी सांगितले.