ठाणे / सुरेश सोंडकर
अवघ्या १५ वर्षे जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्लॅबचा भाग कोसळून कॉलमलाही तडे गेल्याची आणि दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना विटाव्यात घडली. या घटनेमुळे विटाव्यातील अनधिकृत बांधकामे ऐरणीवर आली आहेत. या घटना आता दुर्दैवाने वाढतच जाणार असून जुन्या आणि नव्या अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
गेल्या २० वर्षांत कळवा प्रभागात आणि त्यातील विटावा भागात खाडी बुजवून शेकडो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. अवघ्या २० ते ३० दिवसांत इमारती उभ्या राहिल्याचे वृत्त त्यावेळी अनेकदा छापून आले आहे. मात्र त्यावर त्यावेळी ठोस कारवाई न झाल्याने त्याच इमारती आता माना टाकू लागल्या आहेत. ज्या इमारतींचे स्लॅब तोडण्यात आले होते, ते पुन्हा जोडण्यात आले, परंतु त्याची क्षमता ढासळल्याने आयुष्यमानही कमी झाले. परवा शनिवारी दुर्घटना घडलेली इमारतही त्याच वर्गात मोडणारी आहे.
या दुर्घटनेचा धडा प्रशासनाने वेळीच घ्यावा, असे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांत विटाव्यात अनेक इमारती बेकायदेशीरपणे उभ्या राहिल्या, आजही ही बांधकामे बिनघोर उभी राहत आहेत. कळवा नाका परिसर आणि खारीगावातही तेवढीच बांधकामे जोरात सुरू आहेत. विटावा भागात तर जुन्या इमारतींवर
नवीन मजले चढवण्याचे प्रकार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी विटाव्यात कारवाया झाल्या, परंतु तो देखावा होता हे सिद्ध झाले आहे. कारवाई करण्यासाठी काही तथाकथित बिल्डरांनी कारवाईसाठी नवीन भिंत बांधली. ही भिंत तोडून त्याचे फोटो काढण्यात आले. काही इमारतींवर वरवर कारवाई करण्यात आली. ही सर्व बांधकामे आता पुन्हा सुरू झाली आहेत. तोडलेले स्लॅब आता पुन्हा जोडण्याचे काम सुरू झाले आहे.
या इमारतींचे बांधकाम तकलादू असल्याने कधीही यांना तडे जाऊन मोठी दुर्घटना घडू शकते, परंतु प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कान आणि डोळे दोन्ही बंद केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
नवीन आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर हे दूरदृष्टीचे आणि निर्णय कठोर अधिकारी आहेत. जेवढी गरज शहराला रंगरंगोटीची आहे त्याहून कित्येक पटीने अनधिकृत बांधकामांना चाप लावण्याची आहे. कळवा-विटाव्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांना आणि विविध प्रभागात सुरू असलेल्या बांधकाम धारकांना वेळीच वेसण घालण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात होणाऱ्या दुर्घटनांना जबाबदार होण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट मत आमदार केळकर यांनी व्यक्त केले आहे.