बचत गटांतील महिलांसाठी उमेद माॅल उभारणार – प्रताप सरनाईक

मीरा-भाईंदर महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार

भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा श्रीफळ वाढविला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोड येथील शिवार गार्डन येथे आयोजित भव्य महिला मेळाव्याने निवडणुक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मेळाव्यात उपस्थित ८१ अधिकृत उमेदवार आणि हजारो ‘रणरागिणीं’नी मीरा-भाईंदर महापालिकेवर भगवा फडकवण्याची शपथ घेतली.

हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घेऊन महिला सन्मान आणि सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाखो महिला लाभ घेत आहेत. अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा शिवसेनेचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आत्मनिर्भर महिला समाजाच्या सर्वांगीण विकासासोबतच सुसंस्कृत समाज घडविण्यात मोलाचे योगदान देऊ शकतात, असे सरनाईक म्हणाले.

मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले, मीरा-भाईंदर शहरात वेगवेगळ्या समाजातील नागरिकांसाठी समाज भवन बनविण्यात आले आहेत. काही समाज भवनांचे उद्घाटन झाले असून काही समाज भवनांचे भूमिपूजन झालेले आहे. पुढील काळात बचत गटातील महिलांसाठी उमेद मॉल उभारणार असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली आहे. या उमेद मॉलचे २०२६ मध्येच भूमिपूजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना स्टार प्रचारक व राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी देखील उपस्थित महिलांशी संवाद साधला.