उल्हासनगर: व्यवसाय परवान्यातून महापालिकेला वर्षाला 11 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना उल्हासनगरमध्ये ४० ते ४५ हजारांहून अधिक दुकानदार असून ९९ टक्के दुकानदारांनी व्यवसाय परवानाच घेतलेला नाही. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधींचा फटका बसत आहे.
बाजार निरीक्षकाच्या पथकाने आतापर्यंत चार हजारांहून अधिक दुकानदारांना व्यवसाय परवान्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत कारण आतापर्यंत केवळ 700 दुकानदारांनी व्यवसाय परवाना मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत.
या संदर्भात महापालिकेचे मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे यांनी ‘ सांगितले की, महापालिका कर्मचाऱ्यांनी दुकानदारांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश दुकानदारांना नोटिसा मिळाल्या आहेत. कारण शहरातील केवळ 350 दुकानदारांकडे व्यवसायाचे परवाने असून नोटीस मिळाल्यानंतर 700 दुकानदारांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. शहरातील व्यापाऱ्यांनी व्यवसाय परवाने घेण्याचे आवाहन केणे यांनी केले आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील दुकानदार, हॉटेलचालक, घाऊक विक्रेते आणि इतर विविध व्यावसायिकांना आता व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. परवाना काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने दुकानदारांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. महापालिका प्रशासनाचा यामागे उत्पन्नाचा स्रोत वाढविण्याचा हेतू आहे. मुंबई आणि ठाणे महापालिकेकडूनही अशा प्रकारचा कर वसूल केला जातो त्याच अनुषंगाने व्यवसाय कर वसूल करण्याचा अधिकार महापालिकेला आहे.
महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दुकानदारांना मालमत्ता आणि पाणी कर याशिवाय उत्पन्नाचे इतर स्त्रोत निर्माण करण्यासाठी व्यवसाय परवाना अनिवार्य केला आहे.