निवृत्त शिक्षकांकडे मागितली एक लाखाची लाच
ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना २० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
एका निवृत्त शिक्षकाविरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी बंद करून सेवानिवृत्ती अंशदान व उपदान काढून देण्यासाठी एक लाखाची लाच मागितली होती. त्यापैकी ८० हजार रुपये यापूर्वीच घेतले होते तर, उर्वरित २० हजार रुपये घेताना त्यांना पथकाने पकडले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी शंकर आरे (४४) आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत खंडागळे (५६) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. तक्रारदार हे ६२ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांच्या विरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी बंद करण्यासाठी तसेच सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ (अंशदान व उपदान) मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत २१ एप्रिल २०२६ रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर २२ एप्रिल रोजी पथकाने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून उर्वरित २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शंकर आरे यांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत श्रीकांत खंडागळे यांचाही सहभाग उघड झाल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद आहिरे आणि त्यांच्या पथकाने केली.