कोपरीला दोन नवे जलकुंभ

ठाणे : केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून कोपरी परिसरात दोन जलकुंभांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नेहमी भेडसावणाऱ्या पाणी टंचाईपासून कोपरीवासींची सुटका होणार आहे.

कोपरी परिसराची लोकसंख्या एक लाखांहून अधिक असून त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा तोकडा आहे. पाणी साठवण क्षमता कमी असल्याने नेहमी कोपरीकरांना पाणीटंचाई भेडसावत असते.

कोपरी येथे ४० वर्षांपूर्वी उभारलेल्या दोन जलकुंभांची दुरवस्था झाली आहे. या जलकुंभातील काही ठिकाणांहून पाण्याची गळती होत असल्यामुळे अस्वच्छता होत होती. त्याचबरोबर जलकुंभ कोसळून हानी होण्याचीही भीती होती. याबाबत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी पत्रव्यवहार केला होता.

अखेर या योजनेत कोपरी भागाचा समावेश करण्यात येऊन नवीन दोन जलकुंभांना मंजुरी देण्यात आली आहे. हे नवीन जलकुंभ जुन्या जलकुंभांच्या जागी उभारण्यात येणार आहेत. नव्या जलकुंभांमुळे पुरेशा दाबाने कोपरी परिसरात पाणीपुरवठा होईल. येथील पाणी साठवण क्षमता वाढून पुरेसा पाणी पुरवठा कोपरीकरांना होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कंत्राटदाराला कामाचा कार्यादेश दिला जाईल. त्यामुळे लवकर काम पूर्ण होऊन रहिवाशांना मिळणार आहे.