नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात शनिवार १८ एप्रिल रोजी सज्जामधील छताचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत एक कामगार व एक ग्राहक असे दोघे जखमी झाले आहेत.
एपीएमसी फळ मार्केटमध्ये शनिवारी ऐन गर्दीच्या वेळी एच विंगमधील ६९७ क्रमांकाच्या समोर स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक कामगार आणि एक ग्राहक जखमी झाले असून बाजारात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या ग्राहकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कामगाराच्या डोक्यालाही मार लागला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. दोघांनाही तातडीने उपचारासाठी उपसचिवांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
बाजार आवारामधील अनेक इमारती जीर्ण होऊन धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी स्लॅब पडण्याच्या घटना वरचेवर घडत असतात. पुणे येथील पणन संचालकांनी सामायिक जागेतील छत दुरुस्तीसाठी सुमारे दीड वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. तरीही प्रत्यक्ष काम का सुरू झाले नाही? त्यामुळे एपीएमसी अभियंत्यांच्या निष्काळजी व भोंगळ कारभारामुळेच हा प्रकार घडल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे.