दोन अर्ध शतकांनी पहिला सामना गाजला

ए. टी. स्पोर्ट्सचा डब्ल्युएनएस ग्लोबल संघावर विजय

ठाण्यातील सेंट्रल मैदानात ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धेचा पहिला सामना दोन अर्धशतकांनी गाजला. डब्ल्युएनएस ग्लोबल संघाचा सुनील यादव आणि ए. टी. स्पोर्ट्सचा शिवम घोष यांनी अर्ध शतके केली. या पहिल्याच सामन्यात ए. टी. स्पोर्ट्स संघाने विजय साकारला.

डब्ल्युएनएस ग्लोबल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. संघाने ३५ षटकांत १० गड्यांच्या बदल्यात २१५ धावा उभ्या केल्या. यात सुनील यादव याने चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५२ धावा फटकावल्या. ए. टी. स्पोर्ट्कडून गोलंदाजी करताना अमोल तोरवी याने सात षटकांत ५७ धावा देत तीन बळी मिळवले. समृद्ध गुप्त आणि वंशम व्होरा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर सिद्धार्थ यादव आणि आशिष यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

डब्ल्युएनएस ग्लोबल संघाचे आव्हान पेलताना ए. टी. स्पोर्ट्सच्या शिवम घोष याने सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६९ धावा करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. तर प्रल्हाद मोरे ४४ आणि सिद्धार्थ यादव याने ३२ धावांची भर घातली. ए. टी. स्पोर्ट्सने ३४ .२ षटकांत नऊ गड्यांच्या बदल्यात २१६ धावा करत विजय साकारला. डब्ल्युएनएस ग्लोबल संघाकडून संकेत महाडीकने सर्वाधिक चार बळी घेतले. तर राहुल प्रजापती, अमित भारद्वाज, ईशान धुमाळ, सुनील यादव आणि हर्षद माहुलकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.