मिठी नदी गाळ गैरव्यवहारातील दोन कंपन्यांचा ठाण्यात शिरकाव

* आनंदनगर ते माजिवडा रस्त्याच्या देखभालीकरिता तीन कोटींचे कंत्राट
* न्यायालयात दाद मागण्याचा मनसेचे संदीप पाचंगे यांचा इशारा

ठाणे : मुंबईतील मिठी नदी गाळ गैरव्यवहारातील भ्रष्ट कंपन्यांना ठाणे महापालिकेमध्ये कोणतेही काम देऊ नये, अशी स्पष्ट मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिकेकडे केली होती. मात्र तरीही, यातील दोन कंपन्यांना एमएमआरडीएकडून घोडबंदर रोडवरील आनंदनगर ते माजिवडा रस्त्याच्या देखभालीचे तीन कोटीचे कंत्राटासाठी निविदेमध्ये सहभाग घेतला आहे. अशा लबाड कंपन्यांना कंत्राट बहाल केल्यास थेट न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा पाचंगे यांनी एमएमआरडीएला दिला आहे.

मुंबई महापालिकेतील मिठी नदी गाळ प्रकरणातील ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यातील पाच भ्रष्ट ठेकेदार कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी आनंदनगर ते माजिवडा रस्त्याच्या देखभालीकरिता तीन कोटीच्या निविदेमध्ये सहभाग घेतला आहे.

या भ्रष्ट कंपन्यांनी मिठी नदी गाळ उपसण्याच्या कामांमध्ये बनावट मोजमापे, खोटे दस्तावेज आणि चुकीचे बिलिंग यांसारख्या गंभीर त्रुटी कामात केल्या असून, संबंधित प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. तरी देखील एमएमआरडीएकडून ठाण्यातील महत्वाच्या रस्त्याच्या देखभाली करिता देण्यात येणारे तीन कोटीचे काम या कंपन्यांना पुन्हा देणे म्हणजे जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी ठरेल. मुंबई महापालिकेची फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांच्या कामावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. याबबात एमएमआरडीए प्रशासनाने कठोर पावले उचलून वेळीच भ्रष्टाचार रोखावा. या भ्रष्ट कंपन्यांना या कामात तसेच इतर कोणत्याही कामात सहभागी करून घेऊ नये. तसेच आपण संबंधित कंपन्याना काळ्या यादीत टाकावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करिता न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा मनसेचे संदीप पाचंगे यांनी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता राठोड यांना दिला आहे.