उद्या निवडणूक, प्रशासन सज्ज
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक शनिवार 20 डिसेंबरला होणार आहे. यंदा प्रथमच पॅनल पद्धतीनुसार होणाऱ्या निवडणुकीसाठी 29 प्रभागातून 59 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे.
राज्यातील अन्य नगरपालिकांप्रमाणे अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार होती, मात्र काही तांत्रिक कारणामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. शनिवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
यंदा सर्वसाधारण महिला वर्गातून थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे. नगरसेवक पदासाठी 258 तर नगराध्यक्षपदासाठी आठ महिला उमेदवार उभ्या आहेत. प्रभागांची संख्या 29 असून उमेदवारांची संख्या 59 आहे. दोन लाख 54, 478 मतदारांची नोंद झाली असून पुरुष मतदार एक लाख 35,164 तर महिला मतदारांची संख्या एक लाख 19 हजार तर इतर 22 अशी संख्या आहे.
निवडणुकीसाठी 276 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. 36 झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर एकूण 1621 कर्मचारी नियुक्त असून राखीव पथकांसह एकूण 327 पथके कार्यरत राहणार आहेत.
मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व सुरळीत पार पाडावी यासाठी 80 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 660 पोलीस कर्मचारी , 260 होमगार्ड असा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
एकूण 276 मतदान केंद्रांसाठी मतदान यंत्रे असून 49 राखीव ठेवण्यात आली आहेत. रविवार 21 डिसेंबर रोजी एकूण 29 टेबलांवर 29 प्रभागांची मतमोजणी सकाळी १० वाजता महात्मा गांधी विद्यालय येथे करण्यात येणार आहे.