महिलांमध्ये बळावतोय क्षयरोग

वर्षभरात ४३३८ महिला
तर ३७१८ पुरुष रुग्णांची भर

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोग रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. मागील चार महिन्यात २५०० नव्या रुग्णांची भर पडल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ८०६० रुग्ण आढळले होते. त्यात महिलांची संख्या ४३३८ तर पुरुष रुग्णांची संख्या ३७१८ इतकी आहे. तर चार तृतीय श्रेणीचे रुग्ण आढळून आले असून, या सर्वांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत.

केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याअंतर्गत कोरोनाच्या काळात क्षयरुग्ण शोधण्याची मोहीम ठाण्याने सुरू केली आहे. याशिवाय उपचार अर्धवट सोडणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्याची मोहीमही सुरू आहे. त्यानुसार जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान ८०६० रुग्ण आढळले. ज्यामध्ये कमी प्रतिसाद देणाऱ्या टीबी रुग्णांची संख्या १२०० आहे आणि प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या ६८६० आहे. रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव, सहव्याधी, म्हातारपण, शस्त्रक्रिया केलेले रुग्ण, खराब आहार, योग्य झोप न लागणे यामुळे टीबीचा संसर्ग होऊ शकतो. नागरिकांनी योग्य निदान करून लक्षणे जाणवल्यानंतर औषध घेतल्यास रुग्ण बरा होतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या आजाराचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसावर होतो. फुफ्फुसाशिवाय मेंदू, गर्भाशय, तोंड, यकृत, किडनी, घसा आदी ठिकाणीही टीबी होऊ शकतो. फुफ्फुसाचा टीबी, जो हवेद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. मात्र भीती आणि अंधश्रद्धेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे हा आजार इतर लोकांमध्येही पसरतो. जिल्ह्यात क्षयरुग्णांचा शोध घेण्याची मोहीम सातत्याने सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

वैद्यकीय अहवालानुसार वाढते औद्योगिकीकरण आणि वाहनांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे होणारे वायू प्रदूषण यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत मागील तीन महिन्यात नव्या क्षयरोग रुग्णांची संख्या २५०० वाढल्याचे दिसून आले आहे.

चौकट

जानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान आढळलेल्या रुग्णांची संख्या – ८०६०
पुरुष रुग्णांची संख्या – ३७१८
महिला रुग्णांची संख्या – ४३३८
तृतीयपंथी रुग्णांची संख्या -०४