अख्ख्या मुंब्रा वाहतूक विभागाची पोलीस मुख्यालयात बदली

नाक्यावरची चिरीमिरी भोवली ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली

ठाणे : वाहनचालकांकडून हप्ते वसुली करणाऱ्या मुंब्रा वाहतूक विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकापासून शिपायापर्यंत ३९ जणांची तडकाफडकी बदली करून ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी चांगलाच दणका दिला आहे. अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ठाणे शहरातून उरण येथिल जेएनपीटी आणि गुजरात-दिल्ली या भागातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असते. कंटेनर आणि मोठमोठी वाहने अडवून वाहतूक पोलीस हप्ता वसुल करत असतात. शिळफाटा, कल्याण फाटा येथे अशाच प्रकारचे हप्ते वसुली सुरु असल्याचे चित्रीकरण एका जागरूक नागरिकाने करून ते चित्रीकरण पोलिस आयुक्त श्री.डुंबरे यांच्या नजरेस आणून दिले होते. त्याची गंभीर दखल घेऊन श्री. डुंबरे यांनी मुंब्रा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. खेडेकर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस शिपाई या सर्वांची एका रात्रीत बदली करून त्या सर्वाना मुख्यालयात आणून बसवले आहे.

वाहतूक पोलिसांच्या मदतीकरिता ट्रॅफिक वार्डन ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीनेच वाहतूक पोलीस वसुली करत असल्याचे चित्र सध्या ठाण्यात नजरेस पडत होते. पोलीस आयुक्त श्री. डुंबरे यांनी हा दणका दिल्यामुळे वसुलीला लगाम लागेल, अशी चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे.

कासारवडवली वाहतूक विभागात देखिल असाच प्रकार सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त श्री. डुंबरे यांच्यापर्यंत पोहचली असून पुढचा नंबर कासारवडवली वाहतूक शाखेच्या पोलिसांचा असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

खासगी वाहतूक करणाऱ्या बस मालकांकडून कापुरबावडी आणि कोपरी-नौपाडा या वाहतूक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात हप्ता जातो. त्यामुळेच बिनधास्त विनापरवाना वाहतूक केली जात आहे. त्यांचा देखिल आयुक्त श्री.डुंबरे यांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.