मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक संथ

दहा मिनिटांचा प्रवास झाला दोन तासांचा

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने होऊन वाहनांची कोंडी निर्माण होत असल्यामुळे वाहतूक पर्यायी मागार्ने वळवण्याकरिता ठाणे शहर वाहतूक पोलीस शाखेने नियंत्रण अधिसूचना 1 ऑगस्ट 23 रोजी अखेर जारी केली. दरम्यान खारीगाव टोलनाका ते पडघा हा दहा मिनिटांचा प्रवास वाहतूक कोंडीमुळे दोन तासांचा झाला आहे.

ठाणे शहरातील परिसरातून राज्यांच्या अंतर्गत आणि बाहेरील राज्यातून मुंब्रा बायपासमार्गे जेएनपीटी कळंबोली, नवी मुंबईकडून तसेच मुंबईकडून भिवंडी, नाशिक, गुजरातकडे राज्य महामार्ग क्रमांक तीन अथवा घोडबंदर रोडने दररोज हजारो जड आणि अवजड वाहनांची ये-जा होत असते. त्याचा परिणाम मुख्यत्वे ठाणे शहरातील हजारो लहान आणि मोठ्या वाहनांच्या वाहतुकीवर प्रचंड आणि विपरीत होत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाण्यातील हजारो वाहतूक चालक हा त्रास 24 तास सहन करत आहेत.

पूर्व द्रुतगती महामार्गाच्यालगत असलेल्या असंख्य इमारतींच्या रहिवाशांना मुख्यत्वे रात्रभर आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या लगत असलेल्या इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांना जड आणि अवजड व इतर प्रकारच्या वाहनांच्या कर्कश्श हॉर्नमुळे आणि खड्ड्यातून जाणा-या जड व अवजड वाहनांच्या मोठ्या आवाजामुळे झोपमोड होऊन मानसिक त्रास गेल्या कित्येक महिन्यांपासून सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा वाहनांना शहरातून प्रवेश देऊच नये, अशी जोरदार मागणी ठाणेकरांकडून वाहतूक पोलिसांकडे होऊ लागली. जड आणि अवजड व इतर प्रकारच्या वाहनांची नियमित वर्दळ कायमची बंद करून ती ठाणे शहराबाहेरील रस्त्यांवरून ऐरोली मार्गावरूनच सोडावीत, अशी मागणी ठाणेकरांनी केली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारीगाव टोल नाका ते पडघा दरम्यान दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. येथे जड, अवजड व इतर प्रकारच्या वाहनांची नियमित वर्दळ असते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहने संथ गतीने धावतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन दैनंदिन प्रवास करणारा नोकरदार वर्ग आणि चारचाकी खासगी वाहनांना दहा मिनिटांच्या प्रवासाकरिता सुमारे दोन तास लागत आहेत.

महामार्गावरील खारीगाव ते पडघा दरम्यान अतिवृष्टीमुळे तसेच समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने जुन्या नाशिक-मुंबई महामार्गावरून एकाच वेळी जड-अवजड आणि छोटी वाहने जात असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. त्यामुळे सामान्य नागरिक आणि नोकरदार वर्ग वेळेत इच्छितस्थळी पोहोचू शकत नाही. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी जेएनपीटी, कळंबोली, नवी मुंबई, मुंब्रा बायपास मार्गे आणि भवंडी, नाशिक, गुजरात तसेच मुंबईकडून ठाणे शहरात येणा-या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना ठाणे शहरातील रस्त्यांवर सकाळी पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येणार आहे, अशी ही वाहतूक अधिसूचना ठाणे पोलीस आयुक्त जयजितसिंह यांनी जारी केली.

ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस नाशिक-मुंबई व मुंबई-नाशिक महामार्गावरील खारीगाव टोला नाका ते पडघापर्यंत रस्त्यावरील खड्डे संबंधित प्राधिकरणाकडून बुजविण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.