पावसामुळे ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी

ठाणे: काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे आज सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत ठाण्यातून जाणाऱ्या महामार्गावर आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले.

ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे काल रात्रभर पावसाने थैमान घातले होते. काल रात्री सुमारे ५६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मुंबईमधील रस्त्यांवर पाणी साचले होते, त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घोडबंदर मार्गांवरील गायमुख घाटात एक गाडी बंद पडल्याने या मार्गावर देखिल मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

मुलुंड पूर्व भागातील वाहतूक कोंडी कोपरी पुलापर्यन्त आली होती. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर देखिल वाहतूक कोंडी झाली होती. वंदना, गोखले रोड, रामारुती रोड, स्टेशन रोड, वर्तकनगर, पोखरण रोड, खेवरा सर्कल, पूर्व ठाण्यातील बारा बंगला सर्कल आदी भागातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. मुंगीच्या चालीने वाहने रस्त्यावर चालत होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना कामावर पोहचण्यासाठी उशिर झाला होता. वाहतूक पोलिसांची वाहतुकीचे नियमन करताना तारांबळ उडाली होती.

शहरात पाऊस जोरात पडणार असा इशारा हवामान विभागाने दिला होता. परंतु दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, परंतु पाऊस काही मोठ्या प्रमाणावर पडला नाही. संपूर्ण दिवसभरात शहरात अवघा ३.७९ मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभर पाऊस पडला नाही, परंतु सकाळी ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला होता.