अंबरनाथः येत्या १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात होणाऱ्या उत्सवामुळे या भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अंबरनाथ आणि उल्हासनगर शहराच्या वेशीवर असलेल्या या मंदिराच्या परिसरातील सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद असेल. तर १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या दरम्यान हे वाहतुकीतील बदल लाग असतील अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त वाहनचालकांना वाहतुकीचे बदल पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यांना अंबरनाथ पूर्वेतील हिंदु स्मशानभूमीकडून गोविंद तिर्थ पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. ही वाहने वैभव हॉटेलकडून हिंदु स्मशानभूमीपासून सरळ वडवली सेक्शनमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने हुतात्मा चौकाकडून मटका चौकातून पुढे जातील. तर स्वामी समर्थ चौकाकडून गोविंद तिर्थ पुलामार्गे वैभव हॉटेलकडे जाणाऱ्या तसेच उल्हासनगर कॅम्प पाचमधील कैलास कॉलनीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना स्वामी समर्थ चौक येथे प्रवेश बंद असेल. त्यांनी स्वामी समर्थ चौकातून डाव्या बाजुला वळण घेवुन पुढे रोटरी क्लब वडवली सेक्शन अशी एकतर्फी वाहतूक करून पुढे हिंदु स्मशानभूमीमार्गे वैभव हॉटेलकडे जातील. तसेच स्वामी समर्थ चौकातुन उजव्या बाजुला वळण घेऊन पुढे कानसईमार्गे सुभाष टेकडी रस्त्याने उल्हासनगरला जातील.
वैभव हॉटेलकडून अंबरनाथ रेल्वे स्टेशनमार्गे मटका चौकापर्यंत येणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना वैभव हॉटेल येथे प्रवेश बंद असेल. या वाहनांनी आनंदनगर एमआयडीसी टी जंक्शन येथून फॉरेस्ट नाका, लादीनाका, मटका चौकमार्गे अंबरनाथ पश्चिम येथून पुढे प्रवास करावा. तर औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही असाच प्रवास करावा लागणार आहे. मटका चौकातून पूर्वेकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही फॉरेस्ट नाकामार्गे वैभव हॉटेलकडे जावे लागेल. तर पूर्वेतून येणाऱ्या हलक्या वाहनांना रोटरी क्लब येथे प्रवेश बंद असेल. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हुतात्मा चौक मार्गे प्रवास करावा लागेल.
उल्हासनगरातील वाहने लोकनगरी बस स्थानकाकडून, कैलास कॉलनीकडून येणारी वाहने ओटी सेक्शन, हिललानी पोलीस ठाण्यामार्गे जातील.
या काळात अंबरनाथ पूर्वेतील हिंदु स्मशानभुमी ते गोविंद तीर्थ पुलावर लहान वाहने पार्क होतील. हिंदू स्मशान बॅरीगेट पासून वाहने आत जातील आणि बाहेर पडतील. तसेच मोठी वाहने ही लोकनगरी मैदान येथे पार्क होतील.