समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारीदरम्यान वाहतूक ब्लाॅक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारीदरम्यान अमरावती येथील धामणगाव (ता. चांदूर) आणि नांदगाव खांडेश्वर येथे वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावर हायवे ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी दहा टप्प्यात ९ ते १३ जानेवारीदरम्यान वाहतूक ब्लाॅक घेण्यात आला असून ठराविक वेळेत ठराविक ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावरील अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि नांदगाव खांडेश्वर येथील वाहतूक १० टप्प्यात बंद असणार आहे. चांदूर रेल्वे येथील मांजरखेड गावातील समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक १२०.३००, चांदूर रेल्वे येथील धोत्रा गावातील साखळी क्रमांक १२५.४०० येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक ९ जानेवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्णत बंद राहिल. चांदूर रेल्वे येथील मांजरखेड गावातील साखळी क्रमांक १२३.३०० वरील नागपूर वाहिनीवरील वाहतूक ९ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहिल तर १० जानेवारील धामणगाव येथील वाढोना गावातील साखळी क्रमांक १०८.६०० वरील नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी ३ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद असेल. चांदूर रेल्वे येथील खंबाळा गावातील साखळी क्रमांक १३०.४०० वरील मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहिल.

१२ जानेवारीला चांदूर रेल्वे येथील शहापूर खेकडी गावातील साखळी क्रमांक १४५.२०० वरील नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी ३ ते दुपारी ४ दरम्यान बंद राहणार आहे. त्याच दिवशी नांदगाव खंडेश्वर येथील पाचोड गावातील साखळी क्रमांक १४०.५०० वरील नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी ३ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहिल.

नांदगाव खंडेश्वर, देऊळगाव येथील साखळी क्रमांक १५०.३०० वरील मुंबई वाहिनीवरील वाहतूक १३ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्याच दिवशी नांदगाव खंडेश्वर येथील शहापूर खेकडी गावातील साखळी क्रमांक १४५.२०० वरील मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते दुपारी १ दरम्यान बंद राहणार आहे. १३ जानेवारीलाच नांदगाव खंडेश्वर येथील देऊळगाव येथील साखळी क्रमांक १५०.३०० वरील नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी ३ ते दुपारी ४ पर्यंत बंद राहील. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होणार आहे.