कल्याणमध्ये १०८९ हेक्टरवर होणार टाऊनशिप प्रकल्प

Thanevaibhav Online

5 October 2023

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कल्याणमधील 1089 हेक्टरवर टाऊनशिप प्रकल्पांचे नियोजन केल्याने औद्योगिक विकास केंद्रेही आर्थिक वाढीसाठी योगदान देणार आहेत.

आणगाव आयजीसी, सापे आयजीसी आणि अंबा आयजीसी हे त्यांच्या संबंधित सूक्ष्म-क्षेत्रातील आर्थिक वाढीसाठी, रोजगार आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्याकरीता आणि औद्योगिक विकासात विशेषत: उत्पादन क्षेत्रात आणि उच्च दर्जाच्या उद्योगात योगदान देणारी ठरतील, अशी माहिती प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

सुमारे 1089 हेक्टर क्षेत्रावर मोठ्या टाऊनशिप प्रकल्पांचे नियोजन आहे. ‘ग्रोथ सेंटर’च्या या समुहाचे मुंबई महानगर प्रदेशांतर्गत सर्वसमावेशक, शाश्वत आणि मजबूत विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे आर्थिक विकासाला चालना तर मिळेलच, त्याशिवाय मोठ्या समुदायांच्या जगण्याचा दर्जाही उंचावेल. हा उपक्रम बहुकेंद्री विकास, विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी, परवडणारी घरे आणि मुबलक मोकळ्या जागा असलेल्या एकात्मिक आरोग्य आणि शैक्षणिक पायाभत सुविधांच्या भविष्यासाठी आश्वस्त करतो, असे अधिका-यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश, महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणारा प्रदेश आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या प्रदेशाचे सुमारे चार टक्क्यांचे योगदान आहे. मुंबई महानगर प्रदेशाने सन 2028 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत 0.35 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे योगदान देण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई प्राधिकरणाचा उपक्रम पर्यावरणीय जागरुकतेसह येथील रहिवासींना उत्कृष्ट संधी आणि पायाभत सुविधांनी समृद्ध भविष्याकडे नेण्यासाठी सज्ज होत आहे. या प्रदेशातील प्रस्तावित विकास केंद्रांकरीता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ‘एमएमआरडीए’ला महाराष्ट्र शासनाने औपचारिक मान्यता दिली. त्यामुळे निवडलेल्या प्रदेशांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर विकास केंद्रे विकसित करताना आम्हाला आनंद होईल. विकासात्मक प्रगतीच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल पर्यावरणीय शाश्वततेशी सुसंगत आहे याची खात्री करून, पर्यावरणीय सजगतेसह पुढे जाण्यासाठी प्राधिकरण वचनबद्ध आहे, असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.