ठाणे: खड्डेमय रस्ते आणि वाहतुक कोंडीमुळे त्रासलेल्या वाहनचालकांना आता टोइंग धाडीचाही सामना करावा लागत आहे. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ठाण्यात वाहतूक पोलिसांनी आजपासून वागळे इस्टेट भागात टोईंग कारवाई सुरु केली आहे. दरम्यान, ठाणेकर नागरिकांचा विरोध झुगारून वाहतूक पोलिसांनी पुन्हा टोईंग व्हॅन सुरु केल्याने वाहतुकीला शिस्त लागणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली ठाणे शहर वाहतुक शाखेची टोईंग व्हॅन पुन्हा सुरु झाली आहे. टोईंगचा श्रीगणेशा भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा या भागांत सुरू करण्यात आल्यानंतर आता ठाणे शहरात देखील टोइंग धाडी सुरु झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांना अपेक्षित बदल करून तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने शास्त्रशुद्ध आणि पारदर्शक योजना तयार केल्यानंतरच टोईंग सुरू करण्यात येणार असल्याच्या पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आश्वासनाला प्रशासनाने हरताळ फासल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
ठाणे ते कल्याण, बदलापूर, उल्हासनगर आणि भिवंडीपर्यंत शहर वाहतुक शाखेचे १८ वाहतुक कक्ष असून २१ टोईग व्हॅन कार्यरत होत्या. विविध ठिकाणी बेकायदा पार्क केलेल्या वाहनावर टोईंगद्वारे होणाऱ्या कारवाईमुळे अनेकदा त्या टोइंगवरील कर्मचारी आणि दुचाकी चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते. बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा मध्यंतरी पुन्हा सुरू करण्यात आल्याने ठाण्यात नागरिकांनी विरोध केला. विविध राजकिय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही यााबबत आक्षेप नोंदवत थेट वाहतुक शाखेवर मोर्चा काढला होता.
ठाणे वाहतूक शाखेच्या वागळे इस्टेट परिमंडळात आजपासून टोईंग सुरू करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. अनेक ठिकाणी नो पार्किंग बोर्ड असलेल्या ठिकाणी वाहने लावणे, खासगी कंपनीच्या गेटसमोर बेकायदा पार्किंग करणे, सेवा रस्त्याचा ताबा घेणे अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे या भागात वाहनचालकांना शिस्तीचे धडे देण्यात आले, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले.