मुंबई-गोवा महामार्ग पुर्ण होण्याआधीच टोल वसुली

जन आक्रोश समितीच्या आंदोलनाला कोमसापचा पाठिंबा

ठाणे: मुंबई गोवा कोकण महामार्ग पुर्ण होण्याआधीच पनवेल खारपाडा येथे सक्तीने टोल वसुली करण्यात आली असून या बेकायदा टोल वसुलीच्या विरोधात जन आक्रोश समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. समितीच्या या आंदोलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेने आपला पाठिंबा दर्शवला असून या टोल वसुलीच्या विरोधात आता कोमसाप देखील लढणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र असे असताना पनवेल येथील खारपाडा या ठिकाणी सक्तीची टोल वसुली सुरु करण्यात आली आहे. या विरोधात जन आक्रोश समितीने मागील काही दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेली चार वर्षे जन आक्रोश समिती मुंबई गोवा कोकण महामार्ग लवकर पुर्ण होण्यासाठी सात्यत्याने जन आंदोलन करत आहे. सरकारी दरबारीही पत्रव्यवहार केला जात आहे. मागील वर्षी माणगाव येथे समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. सरकारने त्यावेळी काही आश्वासने दिली होती, मात्र सरकारकडून ही आश्वासने पाळली गेली नाहीत. खारपाडा येथील टोल वसुली विरोधी जनआंदोलनात कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, बाळ कांदळकर , पारसिक बँकेचे निवृत्त प्रबंधक राजन पवार, वाल्मिकी सैंदाणे, शशिकांत घरत या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या प्रसंगी समितीचे खजिनदार जंगम, कार्याध्यक्ष सुरेंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला.

या मुंबई-गोवा महामार्गावर हजारो लोक जखमी झाले आहेत. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. तरीही याकडे सरकारचे लक्ष का जात नाही आणि त्यावर ठोस उपाययोजना का केली जात नाही, असा प्रश्न आता कोकणवासीयांना पडला आहे. प्रत्येक कोकणवासीय नागरीकाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बाळ कांदळकर यांनी केले आहे.